राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचे सूचक विधान, मनसे नेता म्हणाला…
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल सूचक विधान केले. राज्याच्या मनात आहे, तेच मी करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल सूचक विधान केले. राज्याच्या मनात आहे, तेच मी करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर शिवसेना मनसेच्या युतीबद्दलच्या चर्चांना अजूनच उधाण आले. आता यावर मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये मोठा सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबद्दल सूचक विधान केले. “बातम्या सुरू आहेत. काय होणार? कसलं? होणार का? होणार की नाही होणार, कळेल ना. राज्याच्या मनात आहे तेच मी करणार आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
“पण ते होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर गाठीभेटी घेऊ लागले. हॉटेलात भेटतात. मालकाचे नोकर तुम्ही, जर का मुंबईवर ताबा मिळाला नाही. मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आली . अरे आम्ही घेणारच आहोत. मराठी माणसाच्या ताब्यात मुंबई गेली तर मालकाचं कसं होणार. मालकाच्या मित्राचं कसं होणार म्हणून मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. म्हणून शेठजीचे नोकर,. आणि नालायकपणे वर्धापन दिन साजरा करणारे शेठजीच्या नोकरांचे नोकर आहेत. तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही पाहू”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
प्रकाश महाजन काय म्हणाले?
आता यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. याबद्दल माननीय पक्षप्रमुख राज ठाकरे भूमिका घेतील आणि स्पष्ट करतील. त्यामुळे मेळाव्यातून आणि पत्रकार परिषदेतून जो काही प्रतिसाद किंवा प्रस्ताव येतो तो प्रत्यक्षात जेव्हा राज ठाकरेंकडे जाईल, त्यावर राज ठाकरे निर्णय करतील. आता हे सांगणं खूपच घाईचं आणि लवकर होईल असं मला वाटतं, असे प्रकाश महाजन म्हणाले.