Ladki Bahin Yojna : अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार? मंत्री आदिती तटकरे यांनी अखेर सांगितलंच
Aditi Tatkare on MukhyaMnantri Ladki Bahin Yojna : राज्यातील अनेक महिलांनी योजनेसाठी अपात्र असूनही लाडकी बहिणचा लाभ घेतला. त्या महिला लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार की नाही? जाणून घ्या मंत्री आदिती तटकरे यांनी काय म्हटलं?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात गेमचेंजर ठरली. महायुतीला सत्तेत आणण्यात ही योजना निर्णायक ठरली. आपल्याला दरमहा दीड हजारांऐवजी 2 हजार 100 रुपये मिळावेत या उद्देशाने लाभार्थी महिलांनी महायुतीला भरभरुन मतदान केलं. मात्र निवडणूक झाल्यानंतर अपात्र महिलांनी या योजनेचा फायदा घेतल्याचं समोर आलं. त्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार का? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. अखेर या प्रश्नाचं उत्तर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे. तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन सुरु असेल्या वादावरूनही आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. योजनेचं मूल्यमापन करणं यात काही नवीन नाही. इतर योजनेतही दरवर्षी मूल्यमापन केलं जातं. अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. तसेच शासनानं कुठलाही लाभ परत घेतला नाही, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.
“कोणतीही योजना घ्या, त्या योजनांची दरवर्षी फेरतपासणी केली जाते. ‘संजय गांधी निराधार योजना’, ‘गॅस सबसिडी’, ‘नमो शेतकरी योजना’, या अशा सर्व योजनांची वर्षभरातून एकदातरी फेरतपासणी केली जातेच. ही काय नवीन किंवा जगावेगळी प्रक्रिया नाही. लाडकी बहीण योजनेचं हे पहिलंच वर्ष असल्याने याबाबत असा संभ्रम तयार करण्यात येतोय. आतापर्यंत विविध विभागातील थेट लाभांच्या योजनेचं फेरतपासणी करणं ही नियमित प्रक्रिया आहे. त्यात काही वेगळं आहे,असं काही नाही”, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.
“लाभ परत घेतलेला नाही”
“आम्ही अजून परस्पर कोणत्याही लाभार्थ्याचे पैसे परत घेतलेले नाहीत. तसेच ज्या महिलांनी स्वंयइच्छेने आणि विविध कारणांमुळे योजनेसाठी पात्र नसल्याचं आम्हाला कळवलं आहे, हा भाग वेगळा झाला. मात्र आम्ही या महिलांकडूनही पैसे परत घेतलेले नाहीत.
दरम्यान शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना डावलत आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रिपद देण्यात आलं. त्यानंतर गोगावले समर्थकांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्याने तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिली. पालकमंत्रिपदावरुन शिवसेनेच्या नेत्यांनी आणि समर्थकांनी तटकरेंविरोधात उघड उघड विरोधात भूमिका घेतली. भरत गोगावले यांनी आदिती तटकरेंबाबत विधान केलं. त्यावरुन आदिती तटकरे यांना प्रश्न करण्यात आला.
“अशी वक्तव्य करणं माझ्यासाठी आश्चर्यजनक”
“आदिती तटकरे यांना आम्ही जिंकूनच आणायला नको होतं, म्हणजे पालकमंत्रिपदाचा प्रश्नच उद्भवला नसता”, असं भरत गोगावले म्हणाले. यावरुन आदिती तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या की, “अशी वक्तव्य करणं माझ्यासाठी आश्चर्यजनक आहेत. कारण मी आज ज्या मताधिक्याने निवडून आली आहे, त्यात महायुतीचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली आहे. तसेच आम्ही सर्वांनी एकमेकांसाठी काम केलं आहे. एकमेकांसाठी कामच केलं नसतं तर इतकं मताधिक्य आलं नसतं”, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.
“घटक पक्ष म्हणून आम्ही काम केलेलं आहे. महायुतीचा उमेदवार जिंकून यावा, यासाठी आम्ही सर्व घटक पक्षांनी काम केलेलं आहे. त्यामुळे महायुतीला मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे 5 वर्षांनंतर मूल्यमापन होईल. आता आम्ही निवडून आलो आहोत. पुढची 5 वर्ष एकत्रित काम करायचं आहे. त्यामुळे कुरघोड्या आणि इतर खटाटोपांपेक्षा राज्याच्या विकासाला महत्त्व दिलं तर ते योग्य राहिल”, असंही आदिती तटकरे यांनी नमूद केलं.