फलटण महिला डॉक्टर प्रकरणात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझ्या..
MP Dhairyasheel Mohite Patil on Phaltan Doctor Death case : फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली.

फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी तळहातावर गंभीर आरोप लिहून आयुष्याचा शेवट केला. पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांचे थेट नाव संपदा मुंडे यांना हातावर लिहिले. पोलिसांनी यानंतर काही वेळातच पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याला अटक केली. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर आरोपी पीएसआय गोपाळ बदने हा फरार झाला होता. शेवटी तो फलटण पोलिसात हजर झाला. या प्रकरणाला राजकीय वळण लागलंय. एका खासदाराचाही या प्रकरणात दबाव असल्याचे सांगितले जातंय. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ उडालीये.
आता या प्रकरणात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील भाष्य केले. धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले की, मयत व्यक्तीचा वापर मी माझ्या राजकारणासाठी करणार नाही. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एका खासदाराचे आणि त्याच्या पीएचे नाव आले आहे. त्यावर बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही मोठी प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, फलटण येथील मुंडे नावाच्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे, अनेक गोष्टी राज्यासमोर आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी, त्यासाठी चांगली टीम नेमावी आणि त्या कुटुंबाला न्याय द्यावा. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वेळ आली की उत्तर देतो असे म्हणत माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या टीकेला उत्तर देणं टाळले.
महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये कुटुंब घटनास्थळी जाण्यापूर्वीच मृतदेह खाली घेतला आणि रूग्णालयातील पीएम कक्षात ठेवला. स्थानिक प्रशासनाकडून संपदा हिच्यावर सतत दबाव टाकला जात होता. पोलीस प्रशासनाकडुनच ही हत्या करण्यात आली असाही आरोप बांगर यांनी केला आहे. तर पोलीस अधिकारी महाडिकपासून ते खासदार निंबाळकरांसह त्यांच्या पीएची देखील चौकशी झाली पाहिजे अशी थेट नावे घेत विजयसिंह बांगर यांनी मागणी केली आहे.
