
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून महापाैर पदावरून रस्सीखेच सुरू आहे. मुंबईसह कल्याण डोबिंवली महापालिकेत महायुतीची सत्ता आली. कल्याण डोबिंवली महापालिकेत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र येत निवडणुका लढल्या होत्या. कल्याण डोबिंवली महापालिकेत शिवसेना शिंदे गट मोठा पक्ष राहिला आहे. आता महापाैर नक्की कोणाचा होणार यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. नुकताच खासदार श्रीकांत शिंदे हे कोकण भवनात दाखल झाले आहेत. यादरम्यान बोलताना श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, महापाैर हा महायुतीचाच होणार आहे, बाकी कोणाचाही नाही. भविष्यात कोणीहीसोबत येत असेल तर आम्ही विकासासाठी त्याला सोबत घेऊ असे स्पष्ट शब्दात श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. कल्याण डोबिंवली महापालिकेतील महापाैर पदाबद्दल बोलताना श्रीकांत शिंदे यांनी म्हटले, उल्हासनगर, मुंबई आणि कल्याण डोबिंवली महापालिकेत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचाच महापाैर होणार.
पुढे बोलताना श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, कल्याण डोबिंवली महापालिकेचे शिवसेनेचे 53 जे नगरसेवक आहेत, त्यांनी जो आपला गट आहे तो स्थापन केलेला आहे, ते स्थापन करण्यासाठी मी येथे आलो आहे. यासोबतच मनसेचे 5 नगरसेवक देखील त्यांचा गट स्थापन करण्यासाठी येथे आले आहेत. मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी लढलेली आहे आणि युतीमध्येच आम्ही सत्ता ही कल्याण डोबिंवली महापालिकेत स्थापन करणार आहोत.
मुळात म्हणजे जे जे येतील, त्यांचे स्वागत आहे. जेवढी लोकसोबत येतील तेवढे चांगले आहे. मनसेला देखील तेच वाटत असेल. राजू पाटील माझे मित्र आहेत. विकासाच्या मुद्द्यावरून सर्वांनी एकत्र असावे, त्यांना वाटतंय, यामुळे त्यांनी महायुतीला समर्थन दिले. असून तरी महापाैर, उपमहापाैर किंवा सभापती यावर कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाहीये. यासर्वांचे अधिकार एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहेत.
श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची आज किंवा उद्यामध्ये बैठक होईल आणि सत्तास्थापन करण्याबद्दल निर्णय होईल. तुम्हाला वाटत असेल की, येथे भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेऊन सत्ता स्थापन केली जाईल पण तसे नाहीये. भारतीय जनता पार्टी असेल किंवा भाजपा असेल सर्वांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन केली जाईल.