रोहित पवारांना धक्का, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील 7 पैकी तिघांनी सोडलं उपोषण, कारण आलं समोर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील 7 पैकी तिघांनी उपोषण सोडलं आहे. या तिघांनी उपोषण का सोडलं, त्याचे कारण समोर आलं आहे.

MPSC Protest Pune : पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाचा नववा दिवस आहे. पोलिसांनी एस.एम. जोशी पूल मोकळा करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. परंतु आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलक विद्यार्थी आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे. याच दरम्यान महत्वाची माहिती समोर आली आहे.
पुण्यात मागील 9 दिवसांपासून सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष आहे. या आंदोलनात काही दिवसांपासून विद्यार्थी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनात उपोषण करणाऱ्या सातपैकी तिघांनी उपोषण सोडले आहे. ऋषिकेश गांगर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळके यांनी उपोषण सोडलं आहे. तिघांच्या किडनीवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाल्याने उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु इतर चार जणांचे उपोषण सुरू राहणार आहे.
रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी
आमदार रोहित पवार म्हणाले, MPSC चे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात सुरु असलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहामध्ये काही विद्यार्थी हे उपोषणाला बसलेत. त्यातील काहींची तब्येत खालावली. या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ज्येष्ठ मंडळींनी आवाहन केलं. त्यानंतर सोमनाथ चव्हाण, ऋषिकेश गांगर्डे आणि गजानन शेळके यांनी उपोषण सोडलं. विराज शिंदे या चिमुकल्याच्या आणि आमदार विश्वजित कदम यांच्याहस्ते दूध घेऊन त्यांनी उपोषणाची सांगता केली. परंतु MPSC चे अध्यक्ष विवेक भिमनवार यांची विकेट घेतल्याशिवाय आंदोलनाची सांगता होणार नाही, हा सर्वांचा निर्धार मात्र कायम आहे. एमपीएससी आंदोलनामध्ये अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या सात उपोषणकर्त्यांपैकी तीन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले’.
शिवराज मोरेंचा सरकारला इशारा
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, ‘सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आम्ही अलका चौकात आंदोलनाला बसू. सरकार एमपीएससीच्या मागण्यांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करतंय. राज्यातील सर्व युथ काँग्रेसचे कार्यकर्ते यांना दिल्लीतील राहुल गांधी यांच्या आंदोलनाला जाण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. रात्री तीन विद्यार्थ्यांनी तब्येतीच्या कारणास्तव उपोषण सोडलं आहे. मला जेलमध्ये टाकण्याचा अनेक दिवसांपासून प्रयत्न होतोय. नवनाथ बन यांनी माझ्यावर केलेला आरोपावरून हे सिद्ध होण्यास सुरुवात होत आहे’.
