Maharashtra Board 10th Result 2025 Declared : दहावीचा निकाल जाहीर; 94.10 टक्के निकाल, कोणता विभाग अव्वल?
यंदा राज्याचा दहावीचा निकाल टक्के इतका लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे.

Maharashtra Board 10th Result 2025 Declared : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. यंदा दहावीसाठी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी पास झाले. यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० टक्के इतकी आहे. तर २८ हजार १२ खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी पास झाले. तसेच ९ हजार ६७३ दिव्यांग विद्यार्थी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ५८५ विद्यार्थी बसले. यातील ८ हजार ८४८ पास झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.२७ टक्के इतका लागला आहे, असे शरद गोसावी यांनी म्हटले.
या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातील एकूण १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थी बसले. १४ लाख ८७ हजार ३९९ विद्यार्थी पास झाले आहे. त्यांची टक्केवारी ९३.०४ टक्के आहे. फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल ९४.१० टक्के आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचा (खासगी, दिव्यांग, फ्रेश, पुनरपरीक्षार्थी) निकाल ९३.०४ टक्के आहे, असेही शरद गोसावींनी सांगितले.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक
इयत्ता दहावीच्या निकालात कोकण विभागाने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. या विभागाचा निकाल तब्बल ९८.२८ टक्के इतका नोंदवला आहे. तर, दुसरीकडे नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९०.७८ टक्के इतका लागला आहे. तसेच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लागला आहे. या जिल्ह्याचा निकाल ९९.३२ टक्के इतका आहे. याउलट, गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी ८३.६७ टक्के नोंदवला गेला आहे.
लेखी परीक्षेदरम्यान एक दिवसाचा खंड
इयत्ता दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत झाल्या. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना प्रमुख लेखी परीक्षेदरम्यान एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता. निकाल लवकर जाहीर होऊन ११ वीचे वर्ग सुरू व्हावे. तसेच पुरवणी परीक्षेचा निकालही लवकर लागावा यासाठी प्रयत्न होता, असे शरद गोसावी यांनी म्हटले.
ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाला त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. तपास करून हा निर्णय घेतला जाणार आहे. कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी पोलिसांनी मदत केली. प्रत्येक पेपरसाठी नियमित वेळेनंतर १० मिनिटे वाढवून दिली होती. परीक्षेत गैरप्रकार घडला तर कोणती शिक्षा होऊ शकते हे विद्यार्थ्यांना हॉलमध्ये सांगितलं होतं. कोणती शिक्षा होऊ शकते याची कल्पना असावी म्हणून सांगण्यात आलं होतं, असेही शरद गोसावी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे १५ मेपासून पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येणार
दहावी परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत लगतच्या तीन संधी उपलब्ध होणार आहेत. जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज १५ मेपासून करता येणार आहेत, असे मंडळाने स्पष्ट केले.
