Mumbai DCC Bank Election: मुंबई बँक निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा? ‘वर्षा’वर खलबंत; एका जागेवरुन गणित बिघडलं
मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत आता जागा वाटपावरुन शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट एका अतिरिक्त जागेसाठी आग्रही असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Mumbai DCC Bank Election 2026: मुंबई जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा निर्णय भाजप- शिवसेनेने घेतला आहे. शुक्रवारी शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या निवासस्थानी याबाबत बैठक झाली, ज्यामध्ये ही निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला. मात्र आता जागा वाटपावरुन दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. याबाबतच आता एक मोठी अन् महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मुंबई बँक निवडणुकीत जागा वाटपाचा पेच, एका जागेवरुन रस्सीखेच!
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत आता जागा वाटपावरुन शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट एका अतिरिक्त जागेसाठी आग्रही असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेला दोन जागा देण्यासाठी भाजप तयार आहे मात्र शिवसेना शिंदे गट आणखी एक जागा देण्याचा आग्रह करत आहे.
याबाबत शुक्रवारी (20, नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाल्याचंही सुत्रांनी सांगितले आहे. शिवसेना नेते उदय सामंत, सचिन अहिर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही बैठक झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून योग्यवेळी निर्णय घेऊ, असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
सचिन अहिर काय म्हणाले?
याबाबत बोलताना शिवसेना नेते सचिन अहिर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “मुळात जागा किती मिळतात यापेक्षा आमचे प्रतिनिधित्व जायला हवे. गेल्या दीड दोन महिन्यांपासून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाता येईल का? जायचे असेल तर काय करता येईल? याची चाचपणी करत होतो. शेवटी पक्षप्रमुखांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडून संकेत आले तेव्हा या चर्चेला सुरुवात झाली,” असं सचिन अहिर म्हणाले.
तसेच संख्येपेक्षा आम्हाला प्रतिनिधित्व कसे मिळेल हे महत्त्वाचं आहे, असं सचिन अहिर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबई जिल्हा बँक निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय भाजप-शिवसेनेने घेतला आहे. महायुती म्हणून दोन्ही पक्ष सहकार पॅनलमध्ये लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही निवडणूक होईल, असं सांगण्यात आले आहे.
