
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीतील मित्र पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यानंतर महायुतीतील बेबनाव समोर आला आहे. निवडणुका झाल्यानंतर महायुतीत सर्व काही अलबेल असेल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा महायुतीतील संघर्ष उफाळून आल्याचं चित्र आहे. महायुतीतील नेते एकमेकांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. मुंबईचा महापौर भाजपचा (BJP) झाल्यावर आपले कॉलर टाईट होतील, असं भाजपचे नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. लोढा यांच्या या विधानाचा शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी समाचार घेतला आहे. मुंबईचा महापौर महायुतीचा झाल्यावरच कॉलर टाईट होईल, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
मंत्री संजय शिरसाट यांनी मीडियाशी बोलताना हे विधान केलं आहे. आम्हाला मुंबईचा महापौर महायुतीचाच पाहिजे. तो झाला तर आमचे कॉलर टाईट राहील. देवाभाऊबद्दल काय बोलावं हा लोढांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात आम्ही जाणार नाही. दरवेळी त्यांनी काही तरी बोलायचं आणि आम्ही त्यावर स्टेटमेंट द्यायचं, यावरून आमच्यात बेबनाव आहे की काय असं चित्र निर्माण होतंय, ते आम्हाला होऊ द्यायचं नाही. देवाभाऊ त्यांचे आदर्श आहेत. त्यांनी त्यांची पूजा करावी, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी लोढा यांना लगावला आहे.
चव्हाणांनी स्टेटमेंट बदललंय
यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं विधान बदललं आहे. त्यामुळे आता त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही, असं संजय शिरसाट म्हणाले. तसेच अधिवेशनाच्या काळात तिन्ही नेत्यांची बैठक होईल. त्यावेळी पुढची रणनीती ठरली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते लोढा ?
दरम्यान, मंगलप्रभात लोढा यांनी एका कार्यक्रमात मुंबईच्या महापौरपदावरून महत्त्वाचं विधान केलं होतं. मुंबईचा महापौर भाजपचाच होईल. देवाभाऊ भाजपच्या महापौराला शपथ देण्यासाठी महापालिकेत जातील तेव्हाच तुमची आणि माझी कॉलर टाईट होईल. भाजप तर संपूर्ण देवाभाऊंची आहे. पण राज्यातील अनेक पक्ष देवाभाऊंच्या इशाऱ्यावर चालतात, असं विधान मंगलप्रभात लोढा यांनी केलं होतं. त्यामुळे शिंदे गटातून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या.
लोढांच्या म्हणण्यात तथ्य नाही
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. लोढा यांनी जे सांगितले, ते सर्वच नाकारता येत नाही. पण सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे 100 टक्के खोटं आहे. शिवसेना हा पक्ष ध्येय धोरणावर चालतो. त्यामुळे लोढा यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही, असं संजय गायकवाड म्हणाले.
तर आम्ही आमचा महापौर करू
मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपा महायुती एकत्र असेल आणि त्यांच्या जागा जास्त आल्या तर त्यांचाच महापौर होईल. आमचा जागा जास्त आल्या तर आमचा महापौर होईल. मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे. जे नगर पालिकेत झाले आणि त्यांचा फटका आम्हाला बसला. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. म्हणून या गोष्टीची काळजी दोन्ही पक्षांनी घेतली पाहिजे. भाजप जास्त जागा लढणार असल्याने महापौर आमचा होईल असं ते ठामपणे सांगू शकतात. पण महायुती झाली नाही तर आम्ही आमचा महापौर करू, असं गायकवाड म्हणाले.