मुंबईत महापौर कोणाचा? फडणवीस दावोसहून परतताच घडणार मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदेंच्या सूचक विधानाने खळबळ!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या महापौरपदाविषयी मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे. शिंदे यांच्या विधानामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Mumbai Mayor : राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर अशा अनेक महापालिकांत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने बाजी मारली आहे. परंतु अद्याप महापौरपदाची निवड झालेली नाही. मुंबईच्या महापालिकेत नेमका कोणाचा महापौर होणार, याकडे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर होणार की भाजपाचा आपल्या विश्वासाच्या व्यक्तीला महापौरपदावर बसवणार असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. असे असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट समोर येत मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या विधानांमुळे आता वेगवेगळे तर्क लावले जात असून मुंबईच्या महापौरपदाविषयीचा सस्पेन्स वाढला आहे.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या महापौरपदाविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले असताना एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी बोलताना जनतेने महायुतीला स्वीकारलं आहे. मुंबईकरांना विकास पाहिजे. मुंबईकरांनी भाजपा आणि शिवसेनेला बहुमत मिळाले आहे. कोणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये. आम्ही महायुतीने बहुमताचा स्वीकार केलेला असून मुंबईत महायुतीचाच महापौर होईल. फक्त मुंबईच नव्हे तर ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, जळगाव, सांगली, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी आम्ही महायुतीत लढलो. तिथेही महायुतीचाच महापौर होणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
काही लोक अफवा पसरवत आहेत
तसेच, महायुतीचा महापौर होईल पण तो शिवसेनेचा असेल की भाजपाचा याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सोबतच मुंबईचा महापौर ठरवताना अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्यूला आहे का? असे एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. यावर बोलताना. आमच्यात अद्याप कोणताही फॉर्म्यूला ठरलेला नाही. काही लोक अफवा पसरवत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसला गेलेले आहेत. ते परतल्यानंतर आमची बैठक होईल. या बैठकीत सर्व गोष्टींवर चर्चा होईल. महापौरपदावरून आमच्यात मतभेद नाहीत. आमची लढाई सत्ता किंवा खुर्चीसाठी नाही. आमची लढाई ही महाराष्ट्र, मुंबईच्या विकासासाठी नाही, असेही शिंदे म्हणाले.
आम्ही बारगेनिंग करणारे नाही
आम्हाला काय मिळणार यापेक्षा आम्ही जनतेला काय देऊ शकतो, यालाच आमचे प्राधान्य आहे. आमच्यात चर्चा होईल. आमच्यात मतभेद नाही. सर्व गोष्टींवर चर्चा होणार आहे. आम्ही बारगेनिंग करणारे नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत आहोत. आमची युती एका विचारावरून झालेली आहे, असे सांगत त्यांनी मुंबईच्या महापौरपदावर थेट बोलणे टाळले आहे.
