मुंबईत खेकड्यांमुळे बाप लेकांचा गेला जीव, नॅशनल पार्कमध्ये काय घडलं?
तलावात बुडून वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी दुपारी 12.30 वाजता घडली. जेव्हा मुलगा तलावात बुडत होता, त्यावेळी वडीलही त्याला वाचवण्यासाठी गेले. परंतु वडील आणि मुलगा दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कांदिवली पूर्व परिसरातील रामगड येथे खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या वडील आणि मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत वडिलांचे नाव एकनाथ पाटील वय 50 आणि मुलाचे नाव वैष्णव पाटील वय 12 होते. कांदिवली पूर्व येथील क्रांतीनगर येथे ते राहत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
तलावात बुडून मुलाचा आणि वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
समता नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी 12.30 वाजता घडली. जेव्हा मुलगा तलावात बुडत होता, त्यावेळी वडीलही त्याला वाचवण्यासाठी गेले. परंतु वडील आणि मुलगा दोघांचाही बुडून मृत्यू झाला. आपल्या पोटच्या मुलाला तलावात बुडताना पाहून त्यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, मुलाला वाचवण्यात त्यांना यश मिळाले नाही आणि तेही पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव
अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून दोघांनाही तलावाबाहेर काढले. या घटनेनंतर पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेनंतर माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी मोठे आरोप केले आहेत. भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, बोरिवली पश्चिमेतील झाशी की राणी तलावात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला तेव्हा आम्ही आंदोलन केले होते.
माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी केले थेट आरोप
त्यावेळी आम्ही कारवाईची मागणी केली होती. पण अजूनही कुठलाही प्रकारची कारवाई करण्यात आली नाहीये. जर त्या दिवशी कारवाई केली असती तर आज यंत्रणा सतर्क असती आणि असे बुडून मृत्यू झाले नसते. मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुंबई पोलिस आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना आव्हान करतो आणि विनंती देखील करतो, याच्यापुढे कोणाची मृत्यू होऊ नये, याकरिता कडक पाऊले उचलली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे. वडील आणि मुलाच्या मृत्यूमुळे पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
