गाडीतून तीन लाख पडले, मुंबई पोलिसाने बघितलं, पुढे काय घडलं…
मुंबई पोलिसाच्या एका कर्मचाऱ्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने प्राणाणिकपणे रस्त्यावर आढळलेली तीन लाखांची रक्कम पोलिसांना दिली.

आजच्या काळात कोणाच्या खिशातून हजार-पाचशे रुपये रस्त्यावर पडल्यानंतर पुन्हा मिळण्याची शक्यता कमी असते. तुमच्या खिशातून पैसे पडून दहा मिनिटे झाली असेल, तर पुन्हा त्याच ठिकाणी गेल्यावर पैसे पुन्हा मिळण्याची पंचाईत असते. अनेक जण आता लोकांमध्ये आधीसारखा प्रामाणिकपणा उरला नसल्याची खंत व्यक्त करत असतात. परंतु काही मोजकेच प्रामाणिक असतात, असे अनेकदा समोर आले आहे. काही रिक्षावाल्यांनी मौल्यवान वस्तू पुन्हा प्रवाशांना दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत. अशा प्रामाणिक लोकांवर समाजामध्ये कौतुकाचा वर्षाव होतो. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे.
रिक्षावाल्यानंतर आता एका पोलीस कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क तीन लाखांची रोख रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. दुसरा व्यक्ती घेऊन जाण्याआधी पोलिसाने रक्कम सुरक्षितपणे ताब्यात घेतली. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. महेश गावडे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मंत्रालयात ड्युटीला आहेत. पोलीस कर्मचारी महेश गावडे यांनी पोलिसांना रक्कम सोपवताना सांगितलं की, मी मुंबई पोलीस विभागात कार्यरत आहे. सध्या आदिवासी विकास मंत्री उईके यांच्याकडे कार्यरत आहे. मी गेटवरून बाहेर पडत होतो. यावेळी रस्त्यावर वेगाने गाड्या धावत होत्या. एका कारमधून ही पैशांची बॅग पडली. ही कार वेगाने होती. ती बॅग बघितली. ती बॅग रस्त्यावरून चालणारा व्यक्ती उचलत होता. त्यावेळी मी त्याला रोखले’.
‘मी व्यक्तीला आवाज दिला. मी त्याला थांबवून बॅग ताब्यात घेतली. ही बॅग ताब्यात घेऊन मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमधील एसएसआय राणे यांच्या ताब्यात ही रक्कम दिली. यात पाचशेच्या नोटांच्या पाच बंडल आहेत. तर दोनशेच्या नोटांच्या दोन आणि शंभरच्या नोटांची एक बंडल आहे. चिल्लर देखील आहे. काही पैसे रस्त्यावर पडले होते. तर बॅगमध्ये काही होते. ही संपूर्ण रक्कम मी पोलिसांना देत आहे. पोलीस कर्मचारी महेश गावडे यांनी प्रामाणिकपणे तीन लाखांची रक्कम पोलिसांना दिल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
