गणेशोत्सवात डीजेवर बंदी आणली जाणार का? पुणे पोलीस महत्त्वाचं बोलले
पुण्यात गणेशोत्सवात डीजेवर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी आज पुण्यात काही नागरिकांनी मोर्चा काढला. त्यावर पुणे पोलीस उपायुक्तांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात गणेशोत्सवात डीजे बंदीच्या मागणीवरून वाद पेटला आहे. एकीकडे काही नागरिकांकडून डीजे बंदीची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे गणेश मंडळाकडून डीजे बंदीच्या मागणीला विरोध होत आहे. सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनीही हा मुद्दा लावून धरला आहे. डीजे बंदीची मागणी करत असताना त्यांना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या रोषालाही सामोरे जावं लागले. त्यानंतरही त्यांनी डीजे बंदीची मागणी लावून धरली आहे. बापट यांच्यानंतर आता काही नागरिकांनी पुढे येऊन पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढला.
पुण्यात आज रविवारी लाऊड स्पीकरविरोधात पुणेकर मंचाने मोर्चा काढला. या मोर्चात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट सहभागी झाले नाही. विद्यानंद बापट यांच्या निवासस्थानावर पोलिसांचा बंदोबस्त होता. विद्यानंद बापट यांनी मोर्चामध्ये सामील न होण्याची माहिती पोलिसांना दिली. बालगंधर्व चौक ते महानगरपालिका असा मोर्चा निघाला. या मोर्चातील नागरिकांनी पुणे पोलिसांना डीजे बंदीसाठी निवेदन दिलं. त्यानंतर पुणे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले म्हणाले, तुम्ही बघत आहात की, डीजेविरोधातील मोर्चा बालगंधर्व, पुणे मनपापर्यंत आला आहे. साधारण तीनशे ते साडे तीनशे जण आहेत. त्यांनी डीजेच्या विरोधात मोर्चा काढला. त्यांनी एक निवेदन देखील दिलं आहे. त्यांच्या मागणीचा विचार करणार आहोत.
‘सुप्रीम कोर्टाचे मार्गदर्शक तत्त्वे आहेत. लाऊड स्पीकरमुळे ध्वनीप्रदुषण होतं, यासाठी पोलीस आयुक्तांनी प्रत्येक झोनमध्ये बैठका घेऊन प्रत्येक गणेश मंडळांना सूचना दिल्या आहेत. त्याचप्रकारे काल दहीहंडीत भरपूर कमी प्रमाणात डीजे लावले होते. ईद-मिलादमध्येही कमी डीजे लावले. स्पीकरची मर्यादा ओलांडली असेल, ध्वनीची मर्यांदा पाळली नाही, त्यांच्यावर कारवाई केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
डीजे बंदीच्या मागणीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘वाद खूप टोकाला गेला आहे. खूप मोठे सण येणार आहेत. दिवाळीपर्यंत महत्वाचे दिवस आहेत. त्यामुळे समंजसपणे सर्वांना एकत्र बोलावून मार्ग काढणे गरजेचे आहे. माझ्या पुण्यात जन्म झाला. ज्या पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणतो, त्या पुण्याबद्दल सातत्याने चुकीच्या किंवा वाईट कृतीद्वारे बातम्या येत असतात. वर्दीची भीती कुणालाच राहिली नाही, याची काळजी कुणालाच राहिली नाही’.
