Mumbai Rains News LIVE Updates : मुंबई पुणे महामार्गावर पावसामुळे बंद असला तरी टोल वसुली सुरू?
Mumbai Rains News LIVE Updates In Marathi : गेल्या 4 - 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहे. आज देखील हवामान विभागाने अनेक ठिकाणी रेड अर्लट जारी केलाय. राज्यातील महत्वाच्या घडामोडी, पावसाचे अपडेटस, क्रीडा, मनोरंज, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरु असल्यामुळे अनेक ठिकाणी गुडघ्यांपर्यंत पाणी साचलं आहे. तर अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेला देखील बसला आहे. मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. मागील 5 तासांपासून मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरती पाणी साचलं आहे. मुंबई गोवा महामार्ग नागोठणे जवळील वाकण या ठिकाणी ठप्प झाला आहे… अंबा नदीचे पाणी थेट आता मुंबई गोवा महामार्गावर आले आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, नागरिकांना बाहेर न पडण्याचं देखील आवाहन केलं आहे.. तर या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या, कुठे कशी परिस्थिती आहे…
LIVE NEWS & UPDATES
-
राम मंदिर: मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नियुक्तीसाठी तीन सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन
श्री राम मंदिर ट्रस्टने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या (CEO) निवडीसाठी तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीत न्यायपालिका आणि लष्करातील अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समिती सदस्यांमध्ये निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णूकांत आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल सुरेश हावडे यांचा समावेश आहे. ही समिती मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करून आपल्या शिफारसी ट्रस्टला सादर करेल.
-
पालघरच्या जंजरोली येथे NDRF ने 57 जणांची सुटका केली
पालघर जिल्ह्यातील जांजरोली गावातील मंडल पाडा येथे एनडीआरएफतर्फे एक मोठी बचाव मोहीम सुरू आहे. 57 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पुण्यातील एनडीआरएफची 5वी बटालियन, जांजरोली गावातील मंडल पाडा येथे पाणी साचल्यामुळे अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अविरत बचाव आणि मदत कार्य करत आहे.
-
-
मुंबई पुणे महामार्गावर पावसामुळे बंद असला तरी टोल वसुली सुरू?
मुंबई पुणे महामार्ग पावसामुळे बंद आहे. तरीही टोल वसुली असल्याचा आरोप केला आहे. ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर यांनी संताप व्यक्त केला आहे. रस्ता बंद असूनही टोल घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
-
अहिल्यानगर येथे विजेचा धक्का लागून निष्पाप मुलीचा मृत्यू
अहिल्यानगरच्या स्टेशन रोड परिसरात विजेच्या खांब्याचा करंट लागून एका चार वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत मुलीचे नाव प्रियांका गंगार्दे (वय 4 वर्षे) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विजेच्या खांबात विद्युत प्रवाह निर्माण झाला होता.
-
टीईटी पेपरफुटी: चार आरोपींना 18 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणात सोमवारी महत्त्वपूर्ण कायदेशीर कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेले तीन आरोपी – राजीव शॉ (45), आकाश कुमार (30) आणि धीरज सिंग (28), यांच्यासह कथित सूत्रधाराची पत्नी सुमन कुमारी गुप्ता यांना भिवंडी न्यायालयात न्यायाधीश एस. एम. सुतार यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर, न्यायालयाने सर्व चार आरोपींना 18 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
-
-
दिलासादायक! पवना धरण 50 टक्के भरलं, बारा तासांत 13 टक्के साठा वाढला
पिंपरी चिंचवडची तहान भागवणारं पवना धरण 50 टक्के भरल्यानं थोडाका होईना अनेकांना दिलासा मिळालाय. पवना धरण क्षेत्रात पावसाने बॅटिंग करत अवघ्या बारा तासात 267 मिलिमीटरची नोंद केलीये. परिणामी पहाटे 6 वाजता 37 टक्के पाणी साठ्यात थेट 13 टक्के वाढ झालीये.
-
सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ, दोन बंधारे पाण्याखाली
सांगलीच्या वारणा नदीबरोबर आता कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. कृष्णा नदीवरील सांगलीवाडी बंधारा आणि म्हैशाळ बंधारा पाण्याखाली गेले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये ही वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर दुसरीकडे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. वारणा नदीवरील अनेक बंधारे छोटे-मोठे पाण्याखाली गेले आहेत. याचाच आढावा घेतला आहे आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे यांनी.
-
उल्हास नदीचे रौद्ररूप! कल्याण-टिटवाळ्यावर पुराचे सावट, नदी धोक्याच्या पातळीवर
उल्हास नदीने रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे कल्याण-टिटवाळ्यावर पुराचे सावट आले आहे. नदी धोक्याच्या पातळीवर आली आहे. तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. बदलापूरमध्ये रस्ते जलमय झाले आहेत. टिटवाळा, आंबिवली आणि कल्याणमध्ये पुराचा धोका वाढला आहे.
-
पुण्यातील पूरसदृश्य परिस्थितीचा उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी घेतला आढावा
बारामती : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच उद्यापासून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे प्रशासनाचा आढावा घेतला.
-
कोयना धरणाच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ, पाणीसाठा 30.55 टीएमसीवर पोहोचला
कोयना धरणाच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत आहे. 105 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणाचा पाणीसाठा 30.55 टीएमसी वर पोहोचला आहे. बारा तासात कोयना धरणात 3 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.
-
सांगली : मांगले–सावर्डे बंधाऱ्यालगतचा रस्ता गेला वाहून
सांगलीच्या वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने मांगले–सावर्डे बंधाऱ्यालगतचा संपर्क रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे आका या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे मांगले आणि सावर्डे परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-
शहापूर तालुक्यात अतिमुसळधार पाऊस, नागरिकांची गैरसोय
शहापूर तालुक्यात रात्रीपासून अतिमुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. वाशाळा–फुगाळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गावाकडे जाण्यासाठी नागरिकांना छातीभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. फुगाळ व आगनवाडी परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
-
टिटवाळा–बल्याणी मार्ग खचला; मुंबई–वडोदरा प्रकल्पाच्या पर्यायी रस्त्यावर मोठी दुर्घटना
मुसळधार पावसात टिटवाळा–बल्याणी दरम्यानचा पर्यायी रस्ता खचला आहे, यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई–वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळेच ही घटना घडल्याचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी म्हटले आहे.
-
पालघर – पाण्यात अडकलेल्या कारमधील तिघांना वाचवले
पालघर तालुक्यातील वरई सफाळे रस्त्यावर साखरे येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये कार बंद पडल्याने अर्धा पेक्षा अधिक बुडाली होती. कार मध्ये तीन जण अडकून पडले होते. बुडालेल्या कारची माहिती मिळताच साखरे तसेच नावझे गावातील तरुणांनी एकत्र येत पाण्यात उतरून बुडालेली कार दोरीच्या साहाय्याने खेचून बाहेर काढली. कार मधील तिंघांना आता ॲम्बुलन्सच्या साह्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी बदलापूर नगरपालिका सज्ज
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी बदलापूर नगरपालिका सज्ज झाल्याचे नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी सांगितले आहे. बदलापुरातील सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बदलापूर नगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला तहसीलदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
-
मुसळधार पावसाने कल्याण–अहिल्यानगर रोड जलमय
कल्याण–अहिल्यानगर रोडवरील म्हारळ परिसरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक संथ झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रस्त्यालगतच्या अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
-
बदलापुरात उल्हास नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ
बदलापुरात उल्हास नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालीय. धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर पुराचे पाणी मुख्य रस्त्याच्या दिशेनं सरकू लागलय. उल्हास नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनानं पालिकेत तातडीची बैठक बोलावली होती. त्या दृष्टीने उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
-
इन्फ्रास्ट्रक्चरचे क्रेडिट तुम्ही घेता टक्केवारीचे क्रेडिट कोण घेणार- यशोमती ठाकूर
मिसिंग लिंकची काय हालत झाली आहे हे आपण बघत आहोत. देवेंद्र फडवणीस यांनी स्वतःला इन्फ्रा मॅन समजून घेतलं आहे. परंतु इन्फ्रा मॅन नेमकं काय करतो हे कळत नाही… महाराष्ट्र आणि देशाला.. इन्फ्रास्ट्रक्चरचा क्रेडिट तुम्ही घेता टक्केवारीचा क्रेडिट कोण घेणार? जेव्हा मिसिंग लिंकचे उद्घाटन झालं तेव्हा त्या ठिकाणी बळी दिल्या गेला असं माझ्या कानावर आलं असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
-
पुणे ते मुंबई एसटीची सेवा पुढील आदेशापर्यंत बंद
पुणे ते मुंबई एसटीची सेवा पुढील आदेशापर्यंत बंद. रेल्वे, हायवेंवर पाणी साचल्यानं एसटी प्रशासनाचा निर्णय. एसटीने मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका. सकाळी पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या ४ एसटी बसेस ‘उर्से टोल नाका’ परिसरात अडकल्या होत्या, त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्यात माघारी बोलावण्यात आले आहे
-
पुणे–नाशिक महामार्ग पाण्याखाली
पुणे–नाशिक महामार्ग पाण्याखाली. चाकणजवळील वाकीत 4 तासांपासून वाहतूक ठप्प. हजारो वाहनचालक आणि चाकण एमआयडीसीकडे जाणारे कामगार अडकून पडले
-
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे बंद
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे बंद. मात्र कळंबोलीतून पुण्याला जाण्यासाठी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे बंद. फूड मॉलसमोर पाणी साचल्याने महामार्ग बंद. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे नागरिकांना आवाहन
-
बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली
बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या भागातला प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. उल्हास नदीची इशारा पातळी 17.50 मीटरवर. बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज
-
अंधेरी सबवे,वीरा देसाई रोडवर पाणीच पाणी
मुंबई उपनगरात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता रस्त्यांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. अंधेरी सबवे असो किंवा वीरा देसाई रोड दूर-दूरपर्यंत रस्त्यावर फक्त पाणीच पाणी दिसत आहे. वीरा देसाई रोडवर दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आज, पहिल्यांदाच पुरामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून प्रवास करणारी वाहने पाण्यामुळे अडकतात असे वारंवार दिसून आल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे.
-
नाशिकमध्ये उद्या काय-काय बंद राहणार?
नाशिकला उद्या पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. उद्या नाशिकच्या ग्रामीण भागातील शाळा बंद राहणार. उद्या प्रवास टाळा नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन . त्र्यंबकेश्वर देवस्थान उद्या बंद राहणार. आठवडी बाजारासह शाळा बंद राहणार.
-
कल्याणकरांना पाणीटंचाईचा फटका
मुसळधार पावसामुळे मोहिली जलशुद्धीकरण केंद्र जलमय झालं आहे. अनेक भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद. मुसळधार पावसामुळे केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात नदीचे पाणी शिरल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहाड, भोईरवाडी, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, जोशी बाग तसेच बिर्ला कॉलेज ते खडकपाडा चौक परिसरातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती केडीएमसी प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
-
असा निर्लज्जपणा मी आधी कधीच बघितला नाही – अमित ठाकरे
“संपूर्ण राज्यात भीषण परिस्थिती चालू आहे. मला अशा ठिकाणी आल्यावर काय बोलायचं हे कळत नाही. शॉक लागून दोन मुली रुणालयात आहेत. मुंबईत झाडं कोसळून माणसं मरत आहेत. भाजपचा शहराध्यक्ष साटम लोकांच्या मृत्यूवर हसतोय हा माणूस. नीचपणा चालू आहे. एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतो याच्यापेक्षा घाण काय असू शकतं. सगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे, सगळ्यात जास्त आमदार तुमचे, मग का हसतायेत? कारण तीन वर्षे निवडणुका नाही आहेत. हा असा निर्लज्जपणा मी आधी कधीच बघितला नाही” अशी टीका मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली.
-
बदलापूरमध्ये पुरात अडकलेल्या 7 पर्यटकांना वाचवलं
बदलापूर जवळील प्रसिद्ध कोंडेश्वर येथील वाघबीळ परिसरात फिरण्यासाठी गेलेले ७ पर्यटक अचानक आलेल्या पुरात अडकले होते. मात्र बदलापूर अग्निशमन दलाने २ ते ३ तास बचाव मोहीम राबवून या सर्व सातही जणांची सुरक्षित सुटका केली आहे. बदलापूर आणि कल्याण परिसरातील ७ पर्यटक कोंडेश्वर जवळील वाघबीळ भागात ट्रेकिंगसाठी गेले होते.
-
इंद्रायणी नदीला महापूर
इंद्रायणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी. इंद्रायणी नदीला पूर आल्याने आळंदीमधील भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर महाद्वार पायऱ्यांना देखील लागले पाणी. नदीकाठची अनेक दुकानं गेली पाण्यात वाहून. दोन दिवसांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आळंदीहून होणार पंढरपूरकडे प्रस्थान.
-
जेएनपीटी बंदरात जहाजावरील कंटेनर काढण्यासाठी गेलेले तीन कामगार कंटेनरसह उडाले
चक्री वादळाचा फटका जेएनपीटी बंदरातील न्हावा शेवा फिपोर्ट टर्मिनलला बसला आहे. जहाजावरील कंटेनर काढण्यासाठी गेलेले तीन कामगार कंटेनरसह उडाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या तीन कामगारातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतर ही आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर सुविधा उपलब्ध न झाल्याने कामगार वर्गात नैराश्ययाचे वातावरण पसरलं आहे.
-
मुंबईत वृक्ष उन्मळून पडण्याचे सत्र कायम
फ्लॅश
मुंबईत वृक्ष उन्मळून पडण्याचे सत्र कायम; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. वृक्ष कोसळून आतापर्यंत चार मुंबईकरांचा मृत्यू. अंधेरी पश्चिमेतील गावठाण, गल्ली क्रमांक 1, मदिना हाऊस परिसरात वृक्ष कोसळला. पानेरी गल्लीच्या आतील भागात घडली घटना. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार 2 ते 3 वाहनांचे नुकसान. घटनेनंतर परिसरात नागरिकांची गर्दी; प्रशासनाकडून मदतकार्य सुरू
-
खेडमध्ये युवक दुचाकीसह पुरात वाहून; शोधमोहीम सुरु
पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. रेटवडी येथील समीर भिमाजी जाधव हे नाईट शिफ्टवरून घरी परतत असताना बंगला वस्ती येथील ओढ्यावरील पुलावरून दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. समीर भिमाजी जाधव (वय ३०), रा. रेटवडी, खालची ठाकरवाडी हे चाकणहून घरी परतत होते. बंगला वस्ती येथील पुलावरून जाताना ते दुचाकीसह पुरात वाहून गेले. घटनेनंतर पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून शोधमोहीम सुरू आहे. मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.
-
वर्सोवा येथे एक मोठा अपघात
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज वर्सोवा येथे एक मोठा अपघात घडला आहे. वर्सोवा लोखंडवाला, ओशिवरा येथे साडेअकराच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टॅक्सीवर मोठे झाड कोसळले. या घटनेत टॅक्सीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी टॅक्सीमध्ये कोणीही प्रवासी किंवा चालक नव्हता, त्यामुळे कोणतीही जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदेश देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने कोसळलेले झाड तोडून रस्ता मोकळा करून दिला.
-
र्जत पळसदरी-ठाकूरवाडीत दरड कोसळली; पाच वाहनांचे नुकसान
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी-ठाकूरवाडी येथे सोमवारी पहाटे दरड कोसळून पाच वाहनांचे नुकसान झाले. या दुर्घटनेत दोन चारचाकी आणि तीन दुचाकी वाहने मलब्याखाली अडकून त्यांची हानी झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
-
विरार पश्चिमेकडील विवा कॉलेजचा परिसर गेला पाण्याखाली
विरार पश्चिम विवा कॉलेजचा सर्व परिसर पाण्याखाली गेला . मुख्य रस्ता, एमबी इस्टेट, चेरीस होम्स, जैन मंदिर, स्टेशन परिसर, विरार बोलिंज, रस्ता, तिरुपती नगर, युनिटेक परिसर मांडी ते कंबरे इतक्या पाण्याखाली गेला आहे . चेरिस होम्स सोसायटीत कंबरे इतके पाणी साचल्याने पार्किंग मधील कार चक्क गेटवर वाहत आली.
-
इंद्रायणी नदीला पूर, धोक्याची पातळी ओलांडली
इंद्रायणी नदीला पूर आला असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे आळंदी मधील चारही पूल पाण्याखाली गेलेत. उद्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवेश केला आहे त्यांनी आहे त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावे, असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी नगरपरिषदच्या वतीने करण्यात आलं आहे.
-
ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) वर प्लास्टिक अडकल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम
मध्ये रेल्वेच्या विक्रोळी कांजूर मध्ये ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) वर प्लास्टिक अडकल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला. संबंधित प्लास्टिक काढण्याचे काम सुरू आहे. याच कारणामुळे विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान दोन गाड्या थांबवण्यात आल्या होत्या.
-
सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
नवी मुंबई – सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. बेलापूर पासून ते एल पी पर्यंत वाहतूक कोंडी आहे. उरण फाट्यावर एक गाडी बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसाचा प्रवाशांना फटका बसला असून अनेक जण अडकून पडलेत. तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
-
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. दुसरीकडे महामार्ग देखील महामार्ग ठप्प झाला आहे.
-
पुणे-मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक बंद
पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या 4 एसटी बसेस ‘उर्से टोल नाका’ परिसरात अडकल्या आहेत. यामुळे त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्यात माघारी बोलावण्यात आल्यात. त्यामुळे रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवासाचे नियोजन करू नये, अशा सुचना प्रशासनाने केल्या आहेत.
-
मुंबईतील अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका रस्त्यावरील वाहतुकीलाही बसला आहे. अंधेरीतील सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सब वेमध्ये पाणी साचल्याने हा निर्णय घेण्यात आलाय.
-
कोकणात मुसळधार पाऊस, रेल्वे मार्गावर ट्रेन विलंबाने
कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. या पावसाचा परिणाम कोकण रेल्वेवर होतोय. मुंबईवरून कोकणात येणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या उशिरा धावताहेत. तुतारी एक्सप्रेस तब्बल 2 तास उशिराने धावतेय. इतर काही गाड्या देखील सुमारे 4 तासांनी धावाताहेत.
-
रायगडमध्ये पुराचा हाहाकार, 4 नद्यांनी ओलांडली धोकादायक पातळी
रायगडमध्ये पुराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 4 नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. या पावसामुळे रायगडकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे.
-
विधानसभेच्या कामकाजासाठी आमदार भर पावसात सभागृहात
मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे विमान प्रवासात अडचणी झाल्यातरी विधानसभेचे कामकाजावर परिणाम होणार नाही. राज्यातील अनेक आमदार विमानतळावरून थेट विधानसभेत पोहोचू शकतात. त्यामुळे उपस्थितीत मोठी अडचण येणार नसल्याचे बोलले जात आहे. विधानसभेच्या कामकाजासाठी अनेक आमदारांचे प्रश्न सूचीबद्ध आहेत, तसेच संबंधित कामेही महत्त्वाचे आहेत.
-
बदलापुरात उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी
बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी 17.50 मीटरवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. यामुळे 12 हजार लोकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
मुसळधार पावसाचा कहर, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा ठप्प झाला आहे. मागील पाच तासांपासून हा मार्ग ठप्प झाला आहे. अंबा नदीचं पाणी महामार्गावर आल्याने हा मार्ग ठप्प झालाय. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली आहे.
-
आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ
आळंदीत जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीजवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
-
मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला मोठा फटका; मुंबई–पुणे संपर्क खंडित
मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला मोठा फटका; मुंबई–पुणे संपर्क खंडित, तर अप डाऊन मार्गावरील लोकल सेवा देखील 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी जमली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी, चौकशी कक्षांवर वर्दळ वाढली आहे.
-
वारणा खोऱ्यात पावसाची संततधार सुरूच… अनेक छोटे बंधारे गेले पाण्याखाली
सांगलीच्या वाळवा तालुक्यासह वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चिकुर्डे येथील वारणा नदीवरील छोटा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तर सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील मुख्य पुलाला पाणी अगदी घासून वाहत असल्याने या भागातील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.
-
लोणावळ्यात विक्रमी पाऊस.. 24 तासांत तब्बल 625 मिमी पावसाची नोंद
पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 625 मिलीमीटर पाऊस बरसलाय. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झालीये. मात्र यावर्षी आत्तापर्यंत 1715 मिलीमीटर पाऊस झालाय. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत तब्बल 2502 मिलीमीटर इतका पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे दडी मारलेल्या पावसाने जोरदार परसात 24 तासांमध्ये मागील सर्व विक्रम मोडले आहे.
Published On - Jul 06,2026 10:15 AM
