मुंबई तापली… पाणीसाठा अर्ध्यावर; महापालिकेचं मुंबईकरांना मोठं आवाहन काय?

मुंबईत वाढत्या उष्णतेमुळे आणि कमी झालेल्या पाऊस पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठा अर्ध्यावर आला आहे. मुंबई महापालिकेने पाणी जपण्याचे आवाहन केले आहे आणि पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने ही समस्या आणखी चिंताजनक होऊ शकते.

मुंबई तापली... पाणीसाठा अर्ध्यावर; महापालिकेचं मुंबईकरांना मोठं आवाहन काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा अर्ध्याव
| Updated on: Feb 24, 2025 | 12:09 PM

मुंबईत गेल्या काही दिवसापासून उन्हाचा ताप वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाची काहिली होत आहे. तर दुसरीकडे कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा अर्ध्यावर आला आहे. मार्च सुरू होण्याआधीच पाणीसाठा अर्ध्यावर आल्याने मुंबई महापालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. पाऊस जूनमध्ये सुरू होत असला तरी साधारण पावसाचे आगमन जूनच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये होत असते. त्यामुळे तोपर्यंत पाणीसाठी पुरावा म्हणून महापालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे. पाणी टंचाईची शक्यता ओळखून येत्या काळात महापालिका पाणी कपात करण्याचेही संकेत मिळत आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडकसागर, भातसा, तानसा, तुळशी आणि विहार या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत थंडी असते, मात्र यंदा फेब्रुवारी महिन्यातच उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. आताच हा पाणीसाठा अर्ध्यावर आल्याने महापालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

23 फेब्रुवारीला जलसाठा उपलब्ध (दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा – 1,63,299

मोडकसागर – 25,316

तानसा – 63,612

मध्य वैतरणा – 98,803

भातसा – 3,75,432

विहार – 16,438

तुळशी – 4,535

उद्यापासून तापमान वाढणार

दरम्यान, मुंबईत काही दिवसांपासून उन्हाचा ताप जाणवू लागला असून मंगळवारपर्यंत मुंबईचे तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांताक्रूझ येथे कमाल तापमान रविवारी 37.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तापमानातील वाढीबरोबरच वाढत्या आर्द्रतेमुळे उष्मा अधिक प्रमाणात जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी 35 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 37.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

आणखी काही दिवस काहिली

सांताक्रूझ येथील तापमान 5.9 अंशांनी अधिक नोंदले गेले. मुंबईच्या किमान तापमानातही गेल्या दोन दिवसांपासून वाढ होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईचा पारा 37 अंशापेक्षा वर गेला. मुंबईकरांना रविवारी उन्हाचा ताप जाणवला. ही काहिली आणखी काही दिवस सहन करावी लागेल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, बदल ऋतुमानानुसार होत असून अजून उन्हाळ्याचे राज्यात आगमन झालेले नाही, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

महापालिका शिवाजी पार्कात गवत लावणार

दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बीएमसीला धूळ आणि वायू प्रदूषण नियंत्रित करण्याचे निर्देश दिल्यानंतर, महापालिकेने शिवाजी पार्कमध्ये गवत लागवड सुरू करण्याची योजना आखली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका पुढील महिन्यात शिवाजी पार्कमधील जागेवर गवत लागवड सुरू करणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) धुळीचे विस्थापन रोखण्यासाठी अलिकडेच जाहीर केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांनंतर हे पाऊल उचलले आहे.

मध्य मुंबईतील दादर येथे असलेले शिवाजी पार्क हे 28 एकरचे मोकळे मैदान आहे, जिथे क्रीडाप्रेमी, संध्याकाळी आणि सकाळी फिरायला जाणारे आणि पर्यटक नियमितपणे गर्दी करतात. या मैदानाची भूरचना सध्या ओसाड अवस्थेत आहे आणि पृष्ठभागावरील गवत काळानुसार सुकून गेले आहे, परिणामी, जमिनीवरच्या मातीत लाल माती सैल आहे, जी सहजपणे विस्थापित होते, ज्यामुळे परिसरात धुळीचे प्रदूषण होते. गेल्या दोन वर्षांत, स्थानिक रहिवाशांनी या लाल धुळीच्या समस्येबाबत नागरी अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत,