बालभारतीचे भलते प्रयोग, ‘एकवीस’ऐवजी ‘वीस एक’

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणिताच्या अभ्यासक्रमातील संख्या वाचनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार विद्यार्थ्यांना एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णवऐवजी नव्वद तीन अशा नव्या पद्धतीने संख्यावाचन करावे लागणार आहे.

बालभारतीचे भलते प्रयोग, 'एकवीस'ऐवजी 'वीस एक'

पुणे : गेल्या शैक्षणिक वर्षात बालभारतीद्वारे इयत्ता पहिली, आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला  होता. त्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणिताच्या अभ्यासक्रमातील संख्या वाचनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार विद्यार्थ्यांना एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णवऐवजी नव्वद तीन अशा नव्या पद्धतीने संख्यावाचन करावे लागणार आहे. नुकतंच बालभारतीद्वारे इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रमात हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयाचा अभ्यास करणं सोपे जाणार असेल, तरी गणित विषयांच्या शिक्षकांची मात्र चांगलीच गोची होणार आहे.

गणित या विषयाची मुलांना फार भिती वाटते. तसेच यातील संख्यावाचनातील जोडाक्षरे मुलांना बोलताही येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी गणित विषयात नापास होतात. हे लक्षात घेऊन बालभारतीने इयत्ता दुसरीच्या पुस्तकात शैक्षणिक 2019-20 या वर्षापासून महत्त्वाचे बदल केले आहे. या बदलानुसार विद्यार्थी आता संख्यावाचन करताना, अठ्ठावीस ऐवजी वीस आठ, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, बत्तीस ऐवजी तीन दोन अशी नवी पद्धत अमलात आणली आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना जोडाक्षरांची आणि गणिताची भिती मनात राहणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना जोडाक्षरे लिहावे लागणार नाहीत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना संख्या वाचन करणे अधिक सुलभ होईल या दृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. पण या बदलामुळे पहिली दुसरीच्या पालक व शिक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे.

अशा पद्धतीने इंग्रजी, कानडी, तेलगू, मल्याळी आणि तामिळ या दक्षिण भारतीय भाषांमध्ये संख्यावाचन शिकवले जाते. मराठी भाषेत मात्र त्र्याहत्तर, एक्याण्णव, सव्वीस अशा पद्धतीनेच संख्यावाचन करण्याची पद्धत सुरु होती. पण यंदाच्या वर्षीपासून यात बदल करण्यात आला आहे. हा बदल विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा मानला जात आहे.

ज्येष्ठ गणितज्ञ मंगला जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास मंडळाने हा बदल सुचवला आहे. त्यानुसार बालभारतीने नवीन पुस्तक छापून तो अमलात आणला आहे

बालभारतीने केलेला हा नवा बदल पूर्णपणे चुकीचा आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडेल. विद्यार्थ्यांना व्यवहारात जोडाक्षर सहित आकडेमोड असल्याने ही मुले अडाणी ठरतील अशी भीती गणित शिकवणाऱ्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

“बालभारतीची पुस्तके न वापरणारे विद्यार्थी आधीचीच प्रचलित पद्धत वापरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होईल. म्हणूनच बालभारतीने केलेला हा बदल अव्यवहार्य, अनावश्यक आहे. तसेच साडेबारा, अडीच, सव्वा एक अशा शब्दांचे तुम्ही काय करणार असा सवालही शिक्षक विचारत आहेत”.

Published On - 6:15 pm, Mon, 17 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI