Mumbai Bjp New President : भाजपकडून नव्या मुंबई अध्यक्षाच्या नावाची घोषणा, BMC निवडणुकीपूर्वी घेतला महत्वाचा निर्णय
Bjp : मुंबई महापालिका निवडणुकीआधी आज भारतीय जनता पार्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आज मुंबई भाजपला नवीन अध्यक्ष मिळाला आहे. आतापर्यंत आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी होती. शेलार मुंबई अध्यक्षपदाबरोबरच ते राज्य सरकारमध्ये माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री सुद्धा होते.

पुढच्या तीन ते चार महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागू शकतात. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रदेश भाजपकडून आज नव्या मुंबई भाजप अध्यक्षाची निवड जाहीर करण्यात आली आहे. अमित साटम यांना मुंबई भाजपच अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. प्रवीण दरेकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती. पण अमित साटम यांना मुंबई अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. अमित साटम मुंबई उपनगरातून येतात. अमित साटम हा भाजपचा आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून ओळख आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. भाजपने यंदा मुंबई महानगरपालिका जिंकण्याच स्वप्न ठेवलं आहे. त्यांना मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवायचा आहे. मुंबई पालिकेवर आपला झेंडा फडकवायचा हे भाजपच जुनं स्वप्न आहे. आज मुंबईत भाजपचे बुहसंख्या आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून मुंबईत भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात त्यांचे बहुसंख्य आमदार आहेत. उपनगरात भाजपची ताकद जास्त आहे.
भाजपसमोर यंदा ठाकरे बंधुंच आव्हान असू शकतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यंदा एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतात. मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेच एकहाती वर्चस्व होतं. पण 2022 साली शिवसेनेत फुट पडली. दोन गट झाले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिका जिंकणं सोप राहिलेलं नाही. दोन्ही ठाकरे बंधुंचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालातून हे स्पष्ट झालं. त्यामुळे मुंबईत आपली ताकद टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येऊन निवडणुका लढवू शकतात. जेणेकरुन मराठी मतांमध्ये फाटाफूट होणार नाही.
मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी कुठली दोन नावं चर्चेत होती?
मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी दोन नावांची चर्चा होती. अमित साटम आणि प्रवीण दरेकर. अमित साटम हे विधानसभेचे आमदार आहेत, तर प्रवीण दरेकर हे विधान परिषदेतून आमदार आहेत. प्रवीण दरेकर हे सुद्धा मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. प्रवीण दरेकर यांचा प्रवास शिवसेना मनसे आणि भाजप असा झाला आहे. 2009 साली त्यांनी मनसेच्या तिकीटावर मागाठणे विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकली. 2014 साली विधानसभेला पराभूत झाल्यानतंर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना सहकार क्षेत्रात काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे.
नव्या अध्यक्षाच्या निवडीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. 2017 च्या निवडणुका असतील, आत्ताच्या निवडणुका त्यांनी उत्तम काम केलं. मंगलप्रभात लोढा यांनी उत्तम रितीने कार्यभार संभाळला. पुन्हा आशिष शेलार यांच्याकडे धुरा आली, विधानसभेत चांगलं यश मिळालं. मुंबईतील नंबर एकचा पक्ष म्हणून सिद्ध केलं” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांचं कौतुक केलं.
“अमित साटम तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत, नगरसेवक होते. प्रदीर्घ कार्यकाळ राहिला आहे. संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमक अशी त्यांची प्रतिमा आहे. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप मुंबईत घोडदौड राखेल. पुन्हा महायुतीची मुंबईत सत्ता येईल हा विश्वास आहे. सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या ते चांगल्या पद्धतीनं पार पडतील. सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीमागं आहेत. अमित साटम यांना शुभेच्छा देतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
