Ashadhi Ekadashi 2025 : विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला… राज्यात आषाढीचा उत्साह, ठिकठिकाणी अलोट गर्दी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकरी आणि भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी गर्दी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली. मुंबईतील वडाळ्यातील प्रतिपंढरपूर मंदिर आणि डोंबिवली रेल्वे स्टेशनवरही उत्साह पाहायला मिळाला. राज्याच्या विविध भागातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू आला.

विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल… अशा जयघोषात आणि विठ्ठल नामाच्या गजरात आज आषाढी एकादशीचा उत्साह राज्यभरात ओसंडून वाहत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विठू नामाचा गजर सर्वत्र पाहायला मिळत आहे. पंढरपुरात विठ्ठल नामाचा गजर पाहायला मिळत आहे. तसेच मुंबईसह राज्यातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच राज्यभरातून सुमारे १८ ते २० लाख वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपूरच्या मार्गांवर अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. त्यासोबतच प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरातही दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय पूजा
लाखो भक्तांच्या उपस्थितीत आज पहाटे पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आषाढी एकादशीची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्याची भरभराट व्हावी आणि शेतकरी सुखी व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलचरणी विशेष प्रार्थना केली. मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास ही पारंपरिक पूजा पार पडली. या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करून, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची आरतीही त्यांच्या हस्ते करण्यात आली. या वर्षीच्या शासकीय पूजेचा मान सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील शेतकरी दांपत्य बाळासाहेब पाटील आणि श्रीमती शोभा पाटील यांना मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शनाची रांग सुरू ठेवण्यात आली, तर व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला. विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. ज्यामुळे मंदिराचे पावित्र्य अधिकच खुलले होते. नामदेव पायरीलाही सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती.
वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदेंच्या हस्ते पूजा
तर दुसरीकडे मुंबईतील वडाळ्यात असलेल्या प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरातही रात्रीपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वडाळ्यातील प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पुजा केली. आषाढी एकादशीनिमित्त मंदिराला खास फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिराच्या आजूबाजूला हार-फूल आणि प्रसादाची दुकाने पाहायला मिळत आहे. यामुळे परिसरात पंढरीचा अनुभव पाहायला मिळत आहे. मुंबईच्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात रात्रभर किर्तन, टाळ-मृदुंगाच्या गजराने दुमदुमले होते.
डोंबिवलीत एकादशी वारीचा पारंपरिक गजर
तसेच डोंबिवली रेल्वे स्टेशनवरही एकादशी वारीचा पारंपरिक गजर पाहायला मिळाला. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही या वारीला खास उपस्थिती लावली. गेली १७ वर्षे हरी ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ या वारीचे आयोजन करत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर विठुरायाच्या मुर्तीची स्थापना करून दिवसभर हरिनाम संकीर्तन करण्यात आले. त्यामुळे सध्या पंढरपूरपासून ते राज्याच्या कानाकोपऱ्यात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे.