2 बीएचके, 500 चौरस फुटाचे घर… बीडीडी चाळीतील रहिवाशांना दिवाळी गिफ्ट, अखेर हक्काच्या घरांची चावी मिळाली
बीडीडी चाळ लोअर परळ पुनर्विकासातील 557 रहिवाशांना अखेर हक्काची घरे मिळाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 500 चौरस फुटांच्या 2 बीएचके सदनिकांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली. आधुनिक सुविधांनी युक्त ही घरे सरकारकडून मिळालेली एक मोठी भेट आहे, ज्याने अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून हक्काच्या घराची प्रतिक्षा पाहणाऱ्या बीडीडी चाळीतील रहिवाशांची अखेर वणवण संपली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासातील 557 रहिवाशांना हक्कांची घरे देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या लोअर परळमधील 557 पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्यात आले. अखेर या रहिवाश्यांच्या हातात घरांच्या चाव्या आल्या आणि त्यांची दिवाळी गोड झाली. सरकारकडून या रहिवाशांना मिळालेलं हे सर्वात मोठं गिफ्ट आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील तीन इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या रहिवाशांना 160 चौरस फुटांऐवजी 500 चौरस फुटाचे घर देण्यात आले आहे. पात्र रहिवाशांना विनामूल्य मालकी हक्काची सदनिका मिळाली आहे.
या रहिवाशांना 2 बीएचकेची अत्याधुनिक घरे देण्यात आली आहेत. या इमारतींमध्ये दोन प्रवासी लिफ्ट आणि एक फायर लिफ्ट आहे. प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्हीची सुविधा आहे. अग्निरोधक यंत्रणा आणि भूकंपरोधक बांधकाम करण्यात आलं आहे.
अशा आहेत सुविधा
ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या 13.49 एकर जागेवर तळ अधिक 3 मजल्यांच्या 32 चाळींमध्ये 160 चौरस फुट सदनिकेत 2560 भाडेकरू/रहिवासी वास्तव्यास होते. सुमारे दोन ते तीन पिढ्यांपासून 160 चौरस फुटाच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडामार्फत पुनर्वसन इमारतीत 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सर्व सोयी सुविधांनी युक्त 2 बीएचके स्वरुपातील सदनिका मालकी तत्त्वावर विनामुल्य वितरित केली आहे. पुनर्वसन सदनिकेत व्हिट्रीफाईड टाईल, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रानाईट स्वयंपाकाचा ओटा, अग्निरोधक यंत्रणा यासह ब्रांडेड प्लंबिंग फिटिंग्स आदी सारख्या अनेक सुविधा देण्यात आल्या असून भूकंप रोधक तंत्रज्ञानवर आधारित उभारलेल्या या इमारतींमध्ये दोन पॅसेंजर लिफ्ट, एक फायर लिफ्ट, सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत 3 मजल्यांचे बेसमेंट पार्किंग, स्टील्ट एरिया, एक पोडियम आणि प्रशस्त जिने आहेत.
दोन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या या पुनर्विकास प्रकल्पात 22 मजल्यांच्या पुनर्वसन इमारतींच्या 14 विंग उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 7 विंग आणि एका हॉस्पिटल इमारतीचा समावेश आहे. यामध्ये पुनर्वसन इमारतींच्या 3 विंगमधील 557 सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केल्या आहेत. उर्वरित 4 विंगमधील 684 सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारी 2026 मध्ये हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प राबवितांना एकूण भूखंडापैकी सुमारे 65 टक्के जागेचा वापर पुनर्वसनासाठी करण्यात आला आहे.
लोअर परळ बीडीडी पुनर्विकासाची सद्यस्थिती
* पहिल्या टप्प्यात 7 विंग आणि एका हॉस्पिटल इमारतीचा समावेश
* 3 विंगमधील 557 सदनिकांचे वितरण
* उर्वरित 4 विंगमधील 684 सदनिकांचे काम अंतिम टप्प्यात
* दुसऱ्या टप्प्यातील 15 चाळींमधील 1200 गाळेधारकांची पात्रता निश्चित
* पात्र रहिवाशांना दरमहा 39 हजार रुपये संक्रमण भाडे
मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाचा महत्त्वाचा टप्पा
* वरळी, लोअर परळ आणि नायगावमधील 195 चाळींचा पुनर्विकास
* 86 एकर जागेवर पुनर्विकास प्रकल्प
* 15 हजार 593 रहिवाशांचे पुनर्वसन
* वरळीमध्ये आतापर्यंत 1975 सदनिकांचे वितरण
* नायगावमध्ये 1401 सदनिकांचे वितरण
* आता लोअर परळमधील 557 सदनिकांचे वितरण