
Sanjay Raut And Eknath Shinde Meeting: राजकारणातील एक मोठी घडामोड समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. हा राज्यातील राजकारणातील महाभूकंप आहे का? अशी चर्चा रंगली आरहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. या भेटीचा तपशील समोर आला नसला तरी राजकारणात कोणीही कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो. राजकारणात केव्हा काय घडले हे सांगता येत नाही या वाक्यांचा पुन्हा महापूर आला आहे. पण या भेटीने राजकारणात कोणीही अस्पृश्य नसतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. काय आहे ती अपडेट?
एका कार्यक्रमात दोघांची भेट
आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत झाली. या मुलाखतीची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत दोघांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट हल्ला चढवला. या संयुक्त मुलाखतीचा एक भाग प्रसारित झाला आहे. त्यात संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी प्रश्न विचारले. तर ठाकरे बंधुंनी त्यावर सडेतोड उत्तरं दिलं. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
तर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात आज खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. हॉटेल ग्रँड हयातमध्ये एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात या दोन नेत्यांची भेट झाली. या भेटीचा एक फोटो सध्या समोर आला आहे. यामध्ये दोन्ही नेते एकमेकांसमोर आहेत आणि त्यांच्यात काही विचारपूस झाल्याचे समजते. अगोदर संजय राऊत यांची मुलाखत होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम होता. संजय राऊत हे कार्यक्रम आटोपून निघताना आणि त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झाले. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली.
ही औपचारिक भेट ठरली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी फार वार्तालाप केला नाही. पण दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. त्यामुळे राजकारणातील हे एक सुखद चित्र म्हणावे लागेल. या भेटीनंतर दोन्ही नेते त्यांच्या कामासाठी निघून गेले. पण या भेटीची समाजमाध्यमांसह सर्वत्र चर्चा रंगली आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने एकमेकांवर विखारी टीका सुरू असताना या भेटीने महाराष्ट्रातील राजकारणाचा एक आशादायी चेहराही समोर आणला आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चहा पिण्यास माझी काहीही हरकत नसल्याचे वक्तव्य केले होते.