कसाबच्या साक्षीदाराचा उपचारखर्च भाजप उचलणार, फडणवीसांकडून दहा लाखांची मदत जाहीर

हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. काही दिवसांपूर्वी ते मुंबईत फुटपाथवर सापडले होते. (BJP to help Mumbai Attack 26/11 Hero Harishchandra Srivardhankar who witnessed against Ajmal Kasab)

कसाबच्या साक्षीदाराचा उपचारखर्च भाजप उचलणार, फडणवीसांकडून दहा लाखांची मदत जाहीर

कल्याण : मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबची ओळख पटवणाऱ्या साक्षीदाराच्या उपचाराचा खर्च भाजप करणार आहे. कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या दोन गोळ्या झेलणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर चार दिवसांपूर्वी मुंबईत फूटपाथवर आढळले होते. (BJP to help Mumbai Attack 26/11 Hero Harishchandra Srivardhankar who witnessed against Ajmal Kasab)

हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कल्याणमधील आयुष हॉस्पिटलमध्ये भेटीला आले होते. श्रीवर्धनकर यांच्या उपचाराचा खर्च भाजप करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.

भाजपतर्फे श्रीवर्धनकर कुटुंबीयांना 10 लाखांचा मदतनिधी देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले आहे. कल्याण डोंबिवलीचे भाजप नगरसेवक दया गायकवाड यांनी हरिश्चंद्र यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

कोण आहेत हरिश्चंद्र श्रीवर्धनकर?

हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. कसाबला फाशी देण्यात ते मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. हरिश्चंद्र यांनी विशेष न्यायालयासमोर कसाबला ओळखले होते आणि त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती. त्यांच्या पाठीत कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईलने घातलेल्या दोन गोळ्यादेखील लागल्या होत्या. त्यांनी आपल्या ऑफिसच्या बॅगने इस्माईलला मारलेही होते.

हरिश्चंद्र सध्या अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी खर्च परवडत नसल्याचं बोललं जातं. त्यामुळेच ते निराधार अवस्थेत फूटपाथवर आढळले होते.

बरेच दिवस त्यांनी काही खाल्ले नव्हते. मुंबईतील चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील डिसुझा नामक दुकानदाराने श्रीवर्धनकरांना मदत केली आणि पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशी भेट घडवली. तरीही त्यांच्या कुटुंबाला त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याची इच्छा आहे.

(BJP to help Mumbai Attack 26/11 Hero Harishchandra Srivardhankar who witnessed against Ajmal Kasab)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI