
वैभव घाग, मुंबई प्रतिनिधी : राज्याचे उपमख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेना माजी आमदार दगडू सकपाळ यांची भेट घेतली. त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा, तर्क-वितर्काना ऊत आला आहे. दगडू सकपाळ उद्धव ठाकरे गटात आहे. त्यांची मुलगी रेश्मा सकपाळ वॉर्ड क्रमांक 203 मधून उद्धव ठाकरे गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होती. पण भारती पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना एकनाथ शिंदे-दगडू सकपाळ भेटीला महत्व प्राप्त झालं. या भेटीवर एकनाथ शिंदे आणि दगडू सकपाळ कुठलाही गैरसमज नको, म्हणून स्पष्टीकरणही दिलं आहे.
“आज आमचा रोड शो होता. त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांची तब्बेत खराब झाली होती. त्यामुळे त्यांची सदिच्छ भेट घ्यायला आलो होतो. अरे माझे नातेवाईक आहेत ते. आत्ताची ओळख थोडी आहे त्यांची?” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
दगडू सकपाळ काय म्हणाले?
“माझी तब्बेत बरी नाही. म्हणून ते मला आज भेटायला आले. आले म्हणून मी त्यांना सांगू का? उठून जावा म्हणून. हे तुम्ही ठरवले आहे. माहिती मिळाली आत्ता पुढचे विचारा. नुसतच राजकारण म्हणजे झाले काय, त्यांना कुणीतरी सांगितले माझी तब्बेत बरी नाही म्हणून भेटायला आले. माझ्या गावातला माणूस आहे तो. हे तुला आत्ता कसे सांगणार हे सांगतात का?. तुला काय पाहिजे ते मी तुला 20 तारखे नंतर सांगतो” असं दगडू सकपाळ म्हणाले.
आज अचानक ते आमच्या घरी आले
“हे चुकीचं आहे. आम्ही नाराज नाही. एकनाथ शिंदे यांना माहिती मिळाली की माझे वडील आजारी आहेत. त्यामुळे ते भेटायला आले होते. त्यांची कौटुंबिक चर्चा होती, बाकी काही नाही. काही राजकारण नाही आहे. पक्षप्रमुख जे मला आदेश देतील, तो मला मान्य आहे. आमच्यात नाराजी नाही. तिकीट नाकारण्याचे कारण पक्ष प्रमुखानाच माहिती, मी कसे सांगू?. त्यांनी तिकीट नाही सांगितले, त्यांचे असेल काही कारण. आमचे आणि एकनाथ शिंदे यांचे नाते आहे. आमची गावं समोरासमोर आहेत. आज अचानक ते आमच्या घरी आले. त्यांची आणि आमची भेट झाली. ते आमच्या घरी येत आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली” असं रेश्मा सकपाळ यांनी सांगितलं.