लाडकी बहीण योजनेचं श्रेय कुणाचं? शिंदे, फडणवीस की अजित दादा, मुख्यमंत्र्यांचं एका वाक्यात उत्तर
CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडकी बहीण या योजनेवर भाष्य करत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींचा भाऊ कोण याचे उत्तर दिले आहे.

राज्य सरकारची सर्वात सुपरहीट योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेमुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला शानदार विजय मिळाला होता. सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही या योजनेवर भाष्य करत आहेत. महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. अशातच आता या योजनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण?
राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. आज ठाण्यात ठाणे वैभव वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केले आहे. या मुलाखतीत फडणवीस यांना तेजश्री प्रधान यांनी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण? तुम्ही, एकनाथ शिंदे की अजित पवार असा प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे.
आमच्या तिघांवरही त्यांचे प्रेम
लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आम्ही तिघेही त्यांचे लाडके भाऊ आहोत. आमच्या तिघांवरही त्यांचे प्रेम आहे. लाडक्या बहिणींनी तिघांनाही भरभरून दिलेलं आहे. म्हणूनच आम्ही सत्तेमध्ये आहोत.’ दरम्यान, याआधी विरोधकांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या तिन्ही नेत्यांनी हा दावा खोडून काढत ही योजना अखंडपणे सुरू राहणार असल्याचे विधान केले होते.
निवेदकांनी मुख्यमंत्र्यांना सध्या राजकारण ब्रॅण्डचं झालं आहे. मग आम्ही असं समजायचं का की शिंदे फडणवीस हा एक ब्रँड झाला आहे का? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, या महाराष्ट्रात एकच ब्रँण्ड होता, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यानंतर महाराष्ट्रात कोणी ब्रँण्ड नाही, मात्र एवढं नक्की मी आणि एकनाथ शिंदे आमची महायुती इतकी मजबूत आहे, आता कोणीही ब्रँण्ड सांगून आमच्यासमोर उभे राहिले तर आम्ही त्यांचा बॅण्ड वाजवू.’
