
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Shivsena: मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच दोन सेनांचा सामना रंगणार आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील पहिलवान अंगाला तेल लावून मैदानात उतरले आहेत. दोन्ही पक्ष आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा गडासाठी झुंजतील. एकाच पक्षात कधी काळी खांद्याला खांदा लावून लढलेले मित्रही पक्ष फुटीनंतर एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. मराठी मतदारांचा (BMC Election 2026) टक्का अधिक असलेल्या प्रभागात हे दोन्ही वाघ भिडणार आहेत. त्यामुळे मराठी मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राज ठाकरे पण उभे ठाकल्याने कुणाचे पारडे जड हे निकालानंतर समोर येईल.
87 जागांवर दोन्ही पक्ष भिडणार
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना पक्ष फुटीनंतर शिंदे सेना आणि उद्धव सेना हे 69 जागांवर भिडतील. तर 18 जागांवर मनसे विरुद्ध शिंदे सेना अशी सरळ लढत आहेत. अर्थात उद्धव सेना आणि मनसे तर शिंदे सेना आणि भाजप असा हा सामना होईल. मित्र पक्ष धावून आल्याने दोन्ही सेना एकमेकांना निकराचा लढा देतील. पण मराठी बहुल भागात मराठी, मराठी माणूस, मराठी संस्कृती आणि इतर भाषिकांची वाढलेली दादगिरी, मुंबई तोडण्याचा मुद्दा, गुजराती, हिंदी भाषिक वाद खरी रंगत आणणार आहे. त्यामुळे भावनिक मुद्यांसह विकासाची पण बात होणार आहे.
शिवसेना फुटीनंतर मोठ्या संख्येने आमदार शिंदेंच्या पाठीशी उभे ठाकले. तसे 50 हून अधिक नगरसेवक हे शिंदे गटात गेले. त्यातील अनेकांना शिंदे सेनेने तिकीट दिले आहे. तर उद्धव सेनेने काही ठिकाणी ताज्या दमाचे तर काही निष्ठावंतांना तिकीट दिले आहे. अर्थात दोन्ही बाजूचे काही समर्थक नाराज झालेले आहेत. भाजपसोबत युती केल्याने काहींना तिकीट देता आले नाही. तर मनसेला जागा सोडल्याने त्याठिकाणचे उद्धवसेनेचे इच्छुक नाराज झालेले आहेत. त्यामुळे हे बंडखोर कुणाला चितपट करतील हे निकालानंतर समोर येईल.
पण निवडणुकीचा झंझावात जसा वाढेल आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे प्रचारात उतरतील. तसा मराठी बाण्याचा मुद्दा ऐरणीवर येणार आणि शिंदेसेनेसमोर मोठे आव्हान उभं ठाकणार याची पण मुंबईत चर्चा सुरू आहे. अशावेळी भाजप शिंदे सेनाला किती बॅकअप देते याकडे पण राजकीय विश्लेषकांचे लक्ष आहे. पण 87 ठिकाणी चुरशीचा सामना रंगणार हे नक्की आहे.