AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या तुमची वेळ असू शकते… ठाकरेंच्या शिलेदाराचा मुंबईकरांना धोक्याचा इशारा, पत्रात नेमकं काय?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कीर्तिकुमार शिंदे यांनी मुंबईकरांना जाहीर पत्र लिहून भाजप आणि शिंदे सेनेला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे, तसेच ठाकरे आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

उद्या तुमची वेळ असू शकते... ठाकरेंच्या शिलेदाराचा मुंबईकरांना धोक्याचा इशारा, पत्रात नेमकं काय?
uddhav thackeray raj thakcery
| Updated on: Jan 13, 2026 | 12:25 PM
Share

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराचा धडाका सुरू आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते कीर्तिेकुमार शिंदे यांनी मुंबईकरांना उद्देशून एक अत्यंत भावनिक आणि राजकीय पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेवर सडकून टीका केली आहे. तसेच मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी मशाल आणि रेल्वे इंजिन या चिन्हांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या पत्रात नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीयांपासून ते डिलिव्हरी बॉईजपर्यंत सर्वांना साद घातली आहे. यावेळी त्यांनी २०१४ पासूनच्या भाजप सरकारच्या धोरणांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्ष चोरला जाणे आणि चिन्ह गद्दारांच्या हाती देणे या मुद्द्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कीर्तिकुमार शिंदे यांचे पत्र जसेच्या तसे

प्रिय मुंबईकरांनो, सस्नेह जय महाराष्ट्र!

माझं हे पत्ररुपी आवाहन वाचताना किंवा ऐकताना तुम्ही कदाचित लोकलच्या गर्दीत उभे असाल किंवा लांबलचक रांगेत बसची वाट पहात असाल. कदाचित तुम्ही ऑफिसात बाॅसला काय उत्तर द्यायचं किंवा स्विगीच्या जास्तीत जास्त ऑर्डर्स डिलिव्हर करून टार्गेट पूर्ण कसं करायचं या विचारात गर्क असाल. पण कृपया आपल्या मायमराठीसाठी, आपल्या मुंबईसाठी फक्त ५ मिनिटं वेळ काढा आणि थोडा विचार करा.

२०१४ मध्ये देशात भाजपची सत्ता आल्यापासून काय-काय झालं, हे जरा आठवून पहा. मोदीजी प्रत्येक भारतीयाच्या बॅंक खात्यात १५ लाख रूपये जमा करणार होते! नोटबंदीनंतर बाजारात आलेल्या दोन हजाराच्या नोटा गायब झाल्या! जीएसटी करप्रणालीच्या गोंधळामुळे उद्योग-धंद्यांचं झालेलं नुकसान! वर्षाला २ कोटी लोकांना रोजगार! हे सगळं सगळं आपण विसरून गेलो. खरंय ना… आपण खरंच हे सगळं विसरून गेलो… की… त्यांनी एक खूप मोठा भपका निर्माण करून, मोठमोठ्या आणि नवनवीन घोषणा देऊन, त्यांचं अपयश आणि पाप आपल्याला विसरायला लावलं?

एखाद्याने पक्ष सोडणं, बंडखोरी करणं किंवा स्वतंत्र पक्ष स्थापन करणं वगैरे सगळं ठिक आहे. राजकारणात ते होतच असतं. पण मला खरं सांगा- हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना… या पक्षाचं नाव आणि पक्षाची निशाणी… एकनाथ शिंदे यांना बहाल करणं हे तुम्हाला पटलंय का? सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या निशाणीवरून- धनुष्यबाणावरून जी सुनावणी सुरू आहे- त्याचा अंतिम निर्णय यायला खरंच इतकी वर्षं लागतात?

जे उद्धव ठाकरेंसोबत घडलं, तेच शरद पवारांसोबत झालं. आनंद तेलतुंबडे यांच्यासारखे विचारवंत अर्बन नक्सल ठरवले गेले. परवा भाजप सरकारवर टीका केली म्हणून डाॅ. संग्राम पाटील यांना अटक झाली. उद्या वेगळ्या पद्धतीने असंच काहीतरी माझ्यासोबत किंवा तुमच्यासोबतही घडेल! तेव्हा काय करायचं?

शिवसेना असेल, मनसे असेल, काॅंग्रेस असेल, राष्ट्रवादी काॅंग्रेस असेल, सर्व राजकीय पक्षांचे खासदार- आमदार- नगरसेवक- पदाधिकारी- सगळेच्या सगळे भाजपातच का जाताहेत..? शिंदेसेनेतच का जाताहेत..? या प्रश्नांची खरी उत्तरं आपल्याला माहित आहेत. राजकीय दबावामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात बोलता येत नाही, त्यांच्याविरोधात आंदोलन करता येत नाही, हे मी समजू शकतो. पण, एक मराठी म्हणून… एक मुंबईकर म्हणून… आपण भाजपला मत द्यायचं… हे नाही समजू शकत. पटतच नाही मनाला.

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आले. भाजपविरोधात एकत्र यायला- शिवसेना आणि मनसेची ‘शिवशक्ती’ उभी करायला- त्यांनी वेळ लावला, हे खरंय… पण दोन ठाकरे, मराठी माणसाच्या दोन शक्ती एकत्र आल्या ते अधिक महत्वाचं. आता ते एकत्र आलेत म्हणून आपले सर्व प्रश्न एका चुटकीसरशी सुटतील अशी वेडी अपेक्षा बाळयची काही आवश्यकता नाही. पण हेसुद्धा विसरून चालणार नाही की, ठाकरेंमुळे मराठी भाषेची किंवा मराठी माणसाची आजवर कधीही पिछेहाट झालेली नाही. ठाकरे हे मराठी माणसाचं, आपल्या मुंबईचं सुरक्षाकवच आहेत. म्हणूनच, आपलं मराठी राजकारण दोन पावलं पुढे न्यायचं असेल तर झालं गेलं ते विसरून, प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक सच्च्या मुंबईकर व्यक्तीने शिवसेनेची मशाल आणि मनसेचं रेल्वे इंजिन यांच्यासमोरचं बटणच दाबायचं आहे. बाकी, वैचारिक- राजकीय वाद घालायला आपल्याकडे पुढच्या तीन-चार वर्षांचा निवांत वेळ आहेच.

लक्षात ठेवा, १९६६ साली मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना स्थापन करणाऱ्या, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात, शिवसेना पक्षाचं मूळ नाव आणि शिवसेनेची मूळ निशाणी गद्दारांच्या हाती सोपवणाऱ्या भाजपला मुंबईतल्या एकाही मराठी माणसाने, एकाही सच्च्या मुंबईकराने मत द्यायचं नाही म्हणजे नाही.

लक्षात ठेवा, भाजपला आणि शिंदेसेनेला मत द्यायचं नाही. पुन्हा सांगतो, भाजपला आणि शिंदेसेनेला मत द्यायचं नाही. लक्षात ठेवा, शिवसेनेची मशाल आपली आहे. मनसेचं रेल्वे इंजिन आपलं आहे, असे कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान कीर्तिकुमार शिंदे यांचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजकीय वर्तुळात यावर चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेची मशाल आणि मनसेचे रेल्वे इंजिन यांना एकत्र पाठिंबा देण्याचे हे आवाहन प्रत्यक्ष मतदानात किती प्रभावी ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विशेषतः मराठी मतांचे विभाजन टाळून भाजप-शिंदेसेनेला रोखण्यासाठी ठाकरे गटाने ही भावनिक खेळी केली आहे, असे बोलले जात आहे. आता मुंबईकर या पत्राला कसा प्रतिसाद देतात, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

भाजप-शिंदेंचे लोक एकमेकांची धुलाई करताय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
भाजप-शिंदेंचे लोक एकमेकांची धुलाई करताय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा.
हिंदी-मराठी वाद निवडणुकीचा मुद्दा नाही; मैथिली ठाकूरची स्पष्ट भूमिका
हिंदी-मराठी वाद निवडणुकीचा मुद्दा नाही; मैथिली ठाकूरची स्पष्ट भूमिका.
पैसे वाटप करण्याआधी यादी व्हायरल! संभाजीनगरचा धक्कादायक व्हिडीओ
पैसे वाटप करण्याआधी यादी व्हायरल! संभाजीनगरचा धक्कादायक व्हिडीओ.
नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी
नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी.
नाशिक सिव्हिल ICU घोटाळा उघड, डॉक्टर निखिल सैंदाणेंना अटक
नाशिक सिव्हिल ICU घोटाळा उघड, डॉक्टर निखिल सैंदाणेंना अटक.
मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी; राऊतांचा निशाणा
मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी; राऊतांचा निशाणा.
भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली अन् भर सभेत नको ते बोलून गेले
भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली अन् भर सभेत नको ते बोलून गेले.
मुंबईत ठाकरे बंधूंना किती जागा मिळणार? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ
मुंबईत ठाकरे बंधूंना किती जागा मिळणार? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ.
“लाव रे तो व्हिडीओ” म्हणत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर सभेत थेट हल्लाबोल
“लाव रे तो व्हिडीओ” म्हणत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर सभेत थेट हल्लाबोल.
संजय राऊतांकडून लुंगी नेसलेला रवींद्र चव्हाणांचा 'तो' फोटो टि्वट
संजय राऊतांकडून लुंगी नेसलेला रवींद्र चव्हाणांचा 'तो' फोटो टि्वट.