BMC कर्मचारी महापौरांच्या समोरच मॅनहोलमध्ये पडला, रितू तावडे पाहातच राहिल्या; Video व्हायरल

Mumbai Rain : मुंबईच्या अनेक भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. आता महापौर रितू तावडे निरीक्षण दौऱ्यावर असताना त्यांच्या समोरच बीएमसीचा एक कर्मचारी अचानक उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याचे समोर आले आहे.

BMC कर्मचारी महापौरांच्या समोरच मॅनहोलमध्ये पडला, रितू तावडे पाहातच राहिल्या; Video व्हायरल
bmc worker falls into manhole
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 24, 2026 | 5:47 PM

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच माटुंगा परिसरात घडलेल्या एका घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. शहरातील पाणी साचण्याची समस्या आणि नाल्यांची स्थिती पाहण्यासाठी महापौर रितू तावडे निरीक्षण दौऱ्यावर असताना त्यांच्या समोरच बीएमसीचा एक कर्मचारी अचानक उघड्या मॅनहोलमध्ये पडला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रितू तावडे यांच्या पाहणी दौऱ्यावेळी अपघात

मुंबईत पावसाला सुरुवात झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. अशातच माटुंगा परिसरातील विविध नाले आणि पाण्याच्या निचरा व्यवस्थेची पाहणी महापौर आणि प्रशासकीय अधिकारी करत होते. या पाहणीदरम्यान बीएमसीचा एक कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत उपस्थित होता. तो उघड्या मॅनहोलजवळ उभा होता, याच वेळी अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट मॅनहोलमध्ये पडला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या कर्मचाऱ्याला बाहेर काढले.

घटना कॅमेऱ्यात कैद

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये निरीक्षण सुरू असताना संबंधित कर्मचारी नाल्याजवळ उभा असल्याचे दिसते. काही क्षणांतच त्याचा तोल जाऊन तो उघड्या नाल्यात पडतो. मात्र जवळील पोलिस आणि इतर कर्मचारी त्याला तातडीने वाचवतात. या कर्मचाऱ्याला दुखापत झाली की नाही याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष?

माटुंग्यातील या घटनेमुळे पावसाळ्यात काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कारण मुसळधार पावसात नाले, पाणी निचरा व्यवस्था आणि पाणी साचलेल्या भागांची पाहणी करताना कर्मचाऱ्यांना अनेकदा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. घसरडी जागा, पाण्याचा वेगवान प्रवाह आणि उघडे नाले यामुळे अशा दुर्घटनांचा धोका कायम असतो. त्यामुळे अशाप्रकारचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत पालिकेने पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.

महापौर रितू तावडे यांच्यासमोर BMC कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला, अंगावर काटा आणणारा Video

Follow Us