
Mahadevi-Madhuri Elephant : महादेव हत्तीण (माधुरी) परत आणण्याविषयी कोल्हापुरात मोठे आंदोलन झाले. लोक रस्त्यावर उतरले. मोठा मोर्चा काढण्यात आला. विविध आजीमाजी लोकप्रतिनिधी ही आंदोलनात उतरले. त्यानंतर काल मुंबईत मंत्रालयात याविषयी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत हत्तीण परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी वनताराचे सीईओ यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे ही हत्तीण परत आणण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच याविषयीची माहिती ट्विट करत सोशल मीडियावर दिली आहे.
काय झाली चर्चा
वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, वनताराने केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता, असे स्पष्ट केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली.
महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.
या… pic.twitter.com/GOSc9ovVVM— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 6, 2025
कालच्या बैठकीत काय निर्णय?
34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल, अशी मोठी भूमिका मुख्यमंत्र्यांनी कालच्या मंत्रालयातील बैठकीत मांडली. हत्तीणाची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल, आणि तसेच सुप्रीम कोर्टात ही भूमिका मांडेल. तिची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेसक्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा राज्य सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत आहे. माधुरी हत्तीण परत यावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले .