Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन अपरिहार्य, वडेट्टीवारांचे संकेत

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन अपरिहार्य, वडेट्टीवारांचे संकेत
विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात तीन आठवड्यांसाठी कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता

Rohit Dhamnaskar

|

Apr 09, 2021 | 1:18 PM

मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोणत्याच उपायाला यश येताना दिसत नाही. परिणामी लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सूतोवाच विजय वडेट्टीवार यांनी केले.  (3 weeks lockdown may be imposed in Maharashtra)

अशातच केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. लशींचा तुटवडा निर्माण होऊनही महाराष्ट्राला पुरवठा केला जात नाही. याउलट गुजरातला जास्त लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन अपरिहार्य आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच  विनंती करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील लोकल ट्रेनच्या प्रवासावर पुन्हा एकदा निर्बंध आणण्याची शक्यता बोलून दाखविली. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणती नवी घोषणा करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आगामी 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 10 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधकांनी यावरुन राजकारण करु नये. गेल्या महिन्यात एमपीएससीची परीक्षा रद्द झाली तेव्हा भाजपचे नेते रस्त्यावर उतरले. आतादेखील भाजपकडून व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावले जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

पुढच्या दहा दिवसांत महाराष्ट्रात 10 लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची शक्यता

पुढच्या दहा दिवसांत महाराष्ट्रात 10 लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे विरोधकांनी यावर राजकारण न करता आम्हाला उपाय सुचवावेत. सध्याच्या घडीला देशाच्या अनेक भागांमध्ये लॉकडाऊन आहे. गुजरातमध्येही अनेक जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन आहे. मात्र, भाजपचे नेते त्यावर काही बोलत नाहीत. फक्त महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तर भाजपचे नेते टीका करायला सुरुवात करतात, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

अंतिम वर्षाच्या डॉक्टर्सना सेवेत घेणार

कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे लॉकडाऊन आणि गर्दी टाळण्याची गरज आहे. अन्यथा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडेल. त्यामुळे आम्ही अंतिम वर्षाच्या डॉक्टर्सना सेवेत सामावून घेत आहोत. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनाही आम्ही सेवेत सामावून घेतले आहे. या माध्यमातून 5500 हजार डॉक्टर्स उपलब्ध होत आहेत. कोरोनाचा वाढता आकडा पाहता हे मनुष्यबळही अपुरे पडेल. त्यामुळे निष्पाप लोकांचे जीव वाचवण्यासाठी तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

लोकलच्या प्रवासावर पुन्हा निर्बंध आणावे लागतील

विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील लोकल ट्रेनच्या प्रवासावर पुन्हा निर्बंध आणण्याचे सूतोवाच केले. लोकल प्रवासासाठी काही वेळा ठरवून द्याव्या लागतील. आरोग्य यंत्रणा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा द्यायला पाहिजे. त्यामुळे आता गेल्यावेळप्रमाणे लोकल प्रवासाचे नवे धोरण आखण्याची गरज असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: पुण्यात व्हेंटिलेटर्स बेड संपले, ऑक्सिजन बेडसचाही तुटवडा, आता कोव्हिड सेंटरही ‘हाऊसफुल्ल’

महाराष्ट्राला कोरोना लसीचा मुबलक पुरवठा का नाही?, सोशल मीडियावर #MaharashtraNeedsVaccine हॅशटॅग ट्रेंडमध्ये

‘जेवढे प्रयत्न सरकार पाडण्यासाठी करताय तेवढे राज्याच्या हितासाठी करा’, रोहित पवारांचा फडणवीसांवर पलटवार

(3 weeks lockdown may be imposed in Maharashtra)

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें