Dadar Kabutar Khana : ‘आता तुम्ही नाटकं करताय तिथे जाऊन, हेच आधी..’, जैन समाजाच्या आंदोलनावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या…
Dadar Kabutar Khana : दादर कबुतर खाना परिसरात आज राडा पहायला मिळाला. जैन समाजाने आक्रमक होत आंदोलन केलं. बंद केलेला कबुतर खाना सुरु करण्यासाठी ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या वादावर मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दादर कबूतर खाना परिसरात आज जैन समाजाने आक्रमक होत आंदोलन केलं. महापालिकेने बंद केलेला कबुतर खाना सुरु करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला. तिथे दाणे टाकले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने ताडपत्री टाकून कबुतर खाना बंद केला होता. आधी आंदोलन स्थगित करण्यात आल्याच सांगण्यात आलं होतं. मात्र, दहा-साडेदहाच्या सुमारास जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने कबुतरखाना परिसरात पोहोचले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झालीय. पोलिसांनी आंदोलकांना थांबण्याचा प्रयत्न केला.
“जैन समाज आक्रमक होतो. त्यांचाच पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना आत्ता जाग आली. या लोकांनी आधी सगळया गोष्टींचा विचार करायला पाहिजे होता. 93 वर्षापूर्वीचा हा कबुतरखाना आहे. तुम्ही स्वत: इतरांना हिंदू मानत नाही. तुम्ही हिंदू, आम्ही सनातनी असं मानता. हिंदू सनातनीमध्ये पशू, पक्षी आणि प्राणीमात्रांवर दया करा असं सांगितलय” असं उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या. त्या मुंबईच्या माजी महापौर आहेत. “कबुतरांमुळे श्वसानेच आजार होतात हे आता उघड झालय. वेळीच पर्याय दिला असता, व्यवस्था केली असती, तर एवढा समाज अंगावर आला नसता” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
‘आता तुम्ही नाटकं करताय तिथे जाऊन’
“प्रत्येकवेळी समाज अंगावर आल्यावर सरकार बॅकफूटवर जातं. सरकारकडे दुसरी काम नाहीयत, आमदार फोडा, पैसे द्या एवढीच काम त्यांच्याकडे उरली आहेत” अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. “समाजातील सर्वांना एकत्र घेऊन, समाजाला जे मान्य आहे, त्यांना पर्याय देऊन समांतर न्याय दिला पाहिजे. जैन समाज याआधी कधी एवढा खाली उतरला नव्हता” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. “आज ते ज्या सनातनी, हिंदू धर्माला प्राधान्य देऊन भाजपच्या पाठिशी उभे राहतायत. आज त्यांचाच नेता पालकमंत्री आहे. आता तुम्ही नाटकं करताय तिथे जाऊन. हेच आधी तुम्ही करायला पाहिजे होतं, एवढ्या लोकांनी संतप्त होण्याआधी. हे चांगलं नाहीय. सरकार बॅकफूटवर जातय” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
