मुंबईतील शिवाजी पार्काचा चेहरामोहरा बदलणार, महापालिकेकडून महत्त्वाचे आदेश, नेमका बदल काय?
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील दीर्घकालीन धूळीची समस्या आता मुंबई महानगरपालिकेने गवताची लागवड करून सोडवली आहे. ही लागवड आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या मदतीने केली जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील दादर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून धुळीची समस्या भेडसावत आहे. या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या धुळीच्या समस्येवर अखेर मुंबई महानगरपालिकेने तोडगा काढला आहे. या मैदानावर आता गवत लागवड केली जाणार आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मुंबईतील एक महत्त्वाचे मैदान आहे. दरवर्षी हिवाळा सुरु होताच येथील लाल माती हवेत उडून परिसरातील नागरिकांना आणि रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या धुळीमुळे श्वसनाचे आजार आणि इतर आरोग्य समस्यांची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांकडून महापालिकेकडे सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. या तक्रारींची दखल घेत आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी या कामाची पाहणी केली.
मुंबई महापालिकेने तातडीने कार्यवाहीला सुरुवात केली आहे. या धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मैदानात हिरवळ वाढवण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने गवत लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांनी यावेळी मैदान परिसरातील सुधारणा, नियमित देखभाल-दुरुस्ती आणि स्वच्छतेचे आदेशही दिले. या नव्या उपायामुळे शिवाजी पार्कमधील धुळीची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. तसेच या परिसरातील नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळेल अशी अपेक्षा आहे.
सध्या गवत लागवडीचे काम हाती घेण्यात आले असून, यासाठी आयआयटी मुंबईतील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. आयुक्त भूषण गगराणी यांनी या कामाची पाहणी केली असून यामुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
तर दुसरीकडे दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाभोवतीच्या कट्ट्याची दुरवस्था झाली आहे. या नागरिकांकडून त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. काही वर्षांपूर्वी हा कट्टा सुशोभित करण्यात आला होता. मात्र आता त्यावरील विविध रंगांच्या चौकोनी आकाराचे मार्बलचे तुकडे निखळले आहेत. या समस्येची दखल घेत, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी काल (मंगळवारी) संपूर्ण कट्ट्याची पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांना लवकरच तो पूर्वीसारखा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिवाजी पार्क मैदान हे केवळ क्रीडांगण नसून ते परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. मैदानाभोवतीचा कट्टा हा बसण्यासाठी, चालण्यासाठी आणि विसावा घेण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे, त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. आयुक्तांनी स्वतः या कट्ट्याची पाहणी केल्याने आणि तातडीने दुरुस्तीचे आदेश दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे लवकरच हा कट्टा पूर्ववत होईल आणि नागरिकांना त्याचा पुन्हा योग्य वापर करता येईल अशी अपेक्षा आहे.
