
धाराशिव जिल्ह्यातील शिलवडी या गावाचा गेल्या अडीच महिन्यापासून जगाशी संपर्क होत नसल्याचे समोर येत आहे. या गावाजवळून वाहणाऱ्या राम नदीला अडीच महिन्यांपासून पूर असल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच जाता आले नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे की काय असा सवाल विचारला जात आहे. अडीच महिन्यांपासून विद्यार्थी शाळेत येत नसेल तर मग शाळा प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणाधिकारी पण सुट्टीवर गेले आहेत की काय असा संतप्त सवाल तज्ज्ञ विचारत आहेत.
अडीच महिन्यांपासून विद्यार्थी शाळेतच गेले नाही
धाराशिव जिल्ह्यातील शिलवडी जवळ राम नदी वाहते. मे महिन्यापासून या नदीला पूर आहे. छाती इतकं पाणी या नदीतून वाहतं. त्यामुळे शिलवडी गावातील वस्तीवरील विद्यार्थी गावात येऊ शकत नाहीत. त्यांनी गेल्या अडीच महिन्यांपासून शाळेचं तोंड पाहिले नसल्याचे समोर येत आहे. या नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. बालवाडी,इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना यासंबंधी प्रशासनाने कोणतीच कशी कारवाई केली नाही असा सवाल विचारला जात आहे.
पुल तुटला, संतप्त शेतकऱ्यानं दूध नदीत ओतलं
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी गावाचा संपर्क तुटला आहे. पाथरुड वालवड रोडवरील पुल वाहुन गेला. त्यामुळे दुध डेअरी ला दुध घालता येत नव्हते. अखेर संतप्त शेतकरी विशाल परकाळे यांनी 120 लिटर दुध दुधना नदीत ओतुन दिले. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उपचारासाठी थेट आणला ट्रॅक्टर
धाराशिवमधील कळंब तालुक्यातील संजीतपुरचा संपर्क तुटल्याने महिलेला उपचारासाठी ट्रॅक्टर मधून आणले. दोन दिवस मुसळधार पावसामुळे संजीतपूर गावचा संपर्क तुटलेला आहे. तेरणा नदी ओसंडून वाहत आहे संजीतपुर येथील पेशंट छाया रामलिंग बाराते कालपासून दवाखान्यात जायचा प्रयत्न करत होत्या. प्रशासनाचे अधिकारी मंडळाधिकारी व तलाठी यांनी ट्रॅक्टर मधून पेशंट पाण्यातून बाहेर घेत ॲम्बुलन्स मधून प्राथमिक आरोग्य केंद्र दहिफळ येथे पाठवण्यात आले.
शेतकऱ्याचा आर्त टाहो
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदत करावी असा टाहो शेतकऱ्यांकडून फोडण्यात आला. अजितदादा अशी आरोळी ठोकत शेतकऱ्यानं सोयाबीन बुडापासून उपटली. आम्हाला मदत करा म्हणत शेतकऱ्यांनी टाहो फोडला गंगाखेड तालुक्यातील गौडगाव येथे सोयाबीन पिके पाण्याखाली गेली असल्याने दिवाळी साजरी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे. शेतकऱ्यांच्या बियावरती आणि खतांवरती घेतलेली जीएसटी परत केली तरी शेतकऱ्यांना भरपूर मदत होईल, असा सोंग अजित दादांना करता येईल असा टोला शेतकऱ्यांनी लगावला.
अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान
जालन्यातील सोमनाथ परिसरामध्ये मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन ,कपाशी पिकाचा अतोनात नुकसान झालंय. काढलेला सोयाबीनच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे. त्यामुळे सोयाबीनला शेतातच कोंब फुटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे.दरम्यान शासनाने पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
नांदेडमध्ये लेकरा बाळासह शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन
नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव इथल्या नागरिकांनी नुकसानभरपाई तत्काल मिळावी यासाठी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. गोदावरी नदीचे बँक वॉटर मुळे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेला मावेजा तोकडा आहे त्यामुळे मावेजा वाढवून द्यावा आणि तत्काल द्यावा ही या गावकऱ्यांची मागणी आहे. धर्माबाद तालुक्यातील ही रोशनगाव आहे. आज सकाळी 11 वाजेपासून हे आंदोलन सुरू झाले आहे. प्रशासन गावकऱ्यांची समजून काढत आहे