
Eknath Shinde-Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. वर्षाच्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्याने या चर्चांना अधिक हवा मिळाली. शिंदे नाराज असल्याचे प्रकर्षाने जाणवले. वर्षाच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार नाहीत अशी माहिती समोर येत होती. तब्येत ठीक नसल्याने ते ठाण्यात घरीच आराम करतील अशी माहिती समोर येत होती. आज अखेर एकनाथ शिंदे हे कॅबिनेट बैठकीला हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू आहे.
या कारणामुळे नाराजी
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर भाजपने महापालिकेच्या निवडणुकीच तयारी सुरु केली. पण कुणाच्याच ताकास तुरी लागू दिली नाही. जागा वाटपापासून ते महायुतीपर्यंत अनेक ठिकाणी केवळ बैठकांचे जोर सत्र सुरु ठेवले. भाजपने पत्ते काही उघड केले नाही. काही ठिकाणी कमी जागा, तर प्रस्थापित जागांवर भाजपचा दावा यामुळे शिंदेसेना अनेक ठिकाणी नाराज होती. पण अखेरच्या काही तासात भाजपसोबत वाजल्याने राज्यातील २९ पैकी ११ ठिकाणीच महायुती होऊ शकली. इतर १८ ठिकाणी केवळ बैठका, चर्चा आणि तोंडाच्या वाफातच क्रयशक्ती वाया गेली. भाजपने अनेक ठिकाणी झुलवत ठेवल्याचा आरोप शिंदे सेनेच्या नेत्यांनी केला. या सर्व घाडामोडींमुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
तब्येतीचे कारण पुढे
मी पहिले खुलासा करतो कॅबिनेटला एकनाथ शिंदे साहेब तब्येत आणि वैयक्तिक कारणास्तव उपस्थित नव्हते, अशी पहिली प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली. रवींद्र धंगेकर हे पक्षाची भूमिका मांडणारी व्यक्ती नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. ते आमचे महानगरप्रमुख आहेत.धंगेकर आणि निलमताई गोऱ्हे यांच्याशी चर्चा केली आहे. पुण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार मला देखील नाही.शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे भूमिका स्पष्ट करतील.मुंबईत १३७ आणि ९० जागा आम्ही लढतोय आणि आरपीआयला देखील जागा सोडलेल्या आहेत
कृपाशंकर सिंग महायुतीचं धोरण ठरवत नाहीत
कृपाशंकर महायुतीचं धोरण ठरवत नाही. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री धोरण ठरवतील असे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. तिकडे काय चाललं आहे? हे देखील बघितलं पाहिजे. मनसेला फक्त ४५-५० जागा मिळाल्या आहेत. तिकडे, मविआच्या पक्षातील कार्यालये फोडली आहेत. मराठी माणसावरुन राजकारण करणाऱ्यांना मराठी जागा कुठेही मिळाल्या नाही. तिथे पण ठाकरे गटच लढतं आहे. आमच्याकडे कुठेही बंडखोरी झालेली नाही.युती कुठेही तुटलेली नाही. युती झाली तिथलं देखील बोललं पाहिजे.मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली वसई विरार इथे युती झाली आहे, याबद्दल देखील तुम्ही बोललं पाहिजे ना, असे सामंत म्हणाले.