Shinde Sena : शिंदे सेना ही भाजपप्रणित, बड्या नेत्याचा एकनाथ शिंदेंना घराचा आहेर; दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर केले मोठे भाष्य

MNS-Shivsena Alliance : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच मुंबईसह राज्यात मराठी माणूस, मराठी भाषेचा जागर सुरू झालेला आहे. दोन्ही ठाकरेंच्या युतीची चर्चा जोमात असतानाच तिकडे शिंदे सेनेतील एका जुन्या जाणत्या शिलेदारांने बॉम्ब टाकला आहे.

Shinde Sena : शिंदे सेना ही भाजपप्रणित, बड्या नेत्याचा एकनाथ शिंदेंना घराचा आहेर; दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर केले मोठे भाष्य
बड्या नेत्याचा मोठा वार
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 07, 2025 | 3:07 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांचा सुगीचा हंगाम अजून दूर आहे. तीन -चार महिन्यांनी या निवडणुकांचा फड रंगणार आहे. पण त्यापू्र्वीच राज्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे या दोन भावांच्या एकत्रि‍करणाची हलगी वाजली आहे. दोन्ही ठाकरेंच्या युतीची चर्चा जोमात असतानाच तिकडे शिंदे सेनेतील एका जुन्या जाणत्या शिलेदारांने बॉम्ब टाकला आहे. त्यांनी शिंदे सेना ही भाजपप्रणित असल्याचा दावा केल्याने शिंदे सेनेपेक्षा भाजपा अधिक अडचणीत आली आहे. उद्या असाच दावा जर राष्ट्रवादीतूनही आला तर नवल वाटायला नको.

शिंदे सेनेवर गजानन कीर्तिकरांची तोफ

शिवसेनेचा आश्वासक चेहरा असलेले गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना फुटीनंतर शिंदे गट जवळ केला. पण पुढे त्यांना शिंदे सेनेत जणू अज्ञातवास झाला. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून झालेले वादंग सर्वांना आठवतच असेल. आता गजानन कीर्तिकर यांनी राज-उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेदरम्यान मन मोकळे केले. त्यांनी मनातील सल बोलून दाखवले. शिंदे सेना ही भाजप प्रणित असल्याचा घणाघात त्यांनी घातला.

सल बोलून दाखवली

अडीच वर्ष झाली एकनाथ शिंदेंकडे येऊन. एवढं भक्कम संघटनात्मक काम केलं. लोकाधिकार समितीच्या चळवळीत राहून काम केलं. २० वर्ष आमदार, १० वर्ष खासदार, मंत्री पाच वर्ष एवढा अनुभव असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माझा कोणताही उपयोग करून घेतला नाही. याची खंत माझ्या मनात आहे, असे कीर्तिकर म्हणाले.

आता हवी एकच शिवसेना

शिवसेनेच्या मतात विभाजन होतं आणि शिवसेनेचं नुकसान होतं. हे कोणीही सांगेल. सध्या जे आहे हे त्रिभाजन आहे. दोन बंधू एकत्र आल्यावर त्यांचा तरी जनाधार त्यांना मिळेल. एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत लढायचं आहे, कारण शिंदेंची शिवसेना भाजप प्रणित आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस प्रणित आहे. आम्हाला भाजप प्रणित किंवा काँग्रेस प्रणित शिवसेनाच्याऐवजी आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना प्रमाण आहे. हे करण्याचा प्रयत्न करावा. मतदारही त्याच पद्धतीने विचार करतील. दोन बंधू एकत्र आल्यावर शिवसेनेचं गढूळ झालेलं वातावरण शुद्ध होईल असं आम्हाला वाटतं, असे मत कीर्तिकर यांनी व्यक्त केले.

मतांचा गठ्ठा वाढवण्याची ताकद राज ठाकरेंकडे

निवडणुकीचं तंत्र वेगळं आहे. जिंकून येण्यासाठी मतं लागतात. पण मतांचा गठ्ठा वाढवण्यासाठीही काही नेतृत्व लागतं. मतांचा गठ्ठा वाढवण्याची ताकद राज ठाकरे यांच्याकडे आहे. त्यांच्या भाषणामुळे उमेदवार निवडून येत नसतील. पण मत परिवर्तन करण्याची ताकद राज ठाकरेंकडे आहे. उद्धव ठाकरेंकडे आहेच आहे. दोन भाऊ एकत्र येऊन शिवसेना एकसंघ होईलच. पण जनतेला जे हवंय ती शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंनीही त्यांच्यासोबत येऊन एक शिवसेना तयार करायला हवी, असे मोठे वक्तव्य कीर्तिकर यांनी केले.