
राज्यात मराठा आंदोलनाची हलगी वाजली आहे. त्यापूर्वीच दिग्गज नेते शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय अनुभवाची चुणूक दाखवली. ओबीसी पॉलिटिक्सचा श्रीगणेशा त्यांनी नागपुरातून केला. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांनी भाजपच्या वोट बँकेला पहिला खो दिला. भाजपची मदार असलेल्या ओबीसी समाजाला पुन्हा पुरोगामी विचाराकडे आणण्याची खेळी यशस्वी होते का? नागपूर पुन्हा देशातील परिवर्तनाचे नांदी ठरते का, याची उत्तरं काळाच्या उदरात दडलेली आहे. पण पवारांनी ओबीसी कार्ड टाकलं आहे. त्यात आता इस्पिकचा हुकमी एक्का कोण टाकतो त्यावर पुढील राजकीय चाल ठरेल. विधानसभा निवडणुकीत पाशवी बहुमताने महायुती सत्तेत दाखल झाली. आता भाजपासह शिंदे सेना आणि दादांच्या राष्ट्रवादीचे लक्ष्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागले आहे. ओबीसी मतांची बिदगी पदरात पाडण्यासाठी खरंतर भाजपने अगोदरच डाव टाकला. गोव्यातील ओबीसी संमेलनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक साद घातली. दुसरीकडे मराठा -ओबीसी एकीची साद जरांगे पाटील घालत आहेत. त्यातच मराठा मतांची...