पुण्याकडे जाण्यासाठी एक्स्प्रेस वे दुपारी दोन तास बंद

पुण्याकडे जाण्यासाठी एक्स्प्रेस वे दुपारी दोन तास बंद

रायगड : जाहिरातीच्या बोर्डचा सांगाडा लावण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पुण्याच्या दिशेने जाताना शुक्रवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत बंद असेल. त्यामुळे प्रवाशांनी या वेळेत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात आलं आहे. छोट्या वाहनांना या वेळेत पुण्याकडे जाण्यासाठी वेगळ्या रस्त्याचा वापर करावा लागेल.

देशातील पहिला एक्सप्रेस हायवे आणि राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मार्ग हा कोणत्याही कारणाने 15 मिनिटे बंद असणे म्हणजे अनेक प्रवाशांना मनस्ताप आहे. रस्ते दुरुस्ती अथवा अपघाताच्या कारणामुळे अचानक काही लेन बंद कराव्या लागल्यास वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागतात.

मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर 17 किमी अंतरावर म्हणजेच रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाहिरात फलकाचा भला मोठा सांगाडा बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 वेळेत पुण्याकडे जाणारा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

या अगोदर याच मार्गावर दोन ठिकणी असे गँन्ट्री म्हणजेच जाहिरात फलकाचा सांगाडा बसविण्यात आला. त्यावेळीही मार्ग बंद करण्यात आला होता. प्रवाशांना अगोदरच सूचना दिल्यामुळे तारांबळ होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. तरीही प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करणं गरजेचं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI