बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन, तरुणीची भाजप नगरसेवकाला धमकी

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन, तरुणीची भाजप नगरसेवकाला धमकी


कल्याण : बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन, अशी धमकी देत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भाजप नगरसेवकाला देत, तरुणीने तीन लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने तरुणीचा पर्दाफाश झाला. धक्कादायक म्हणजे, याच तरुणीने दोन वर्षांपूर्वी याच नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र या गुन्ह्यात त्यांची निर्दोष सुटका झाली होती. दया गायकवाड असे भाजप नगरसेवकाचे नाव आहे.

भाजप नगरसेवक दया गायकवाड यांच्याकडून तीन लाख रुपयांची खंडणी घेताना, तरुणीला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

सीसीटीव्हीमध्ये काय?

कल्याण पश्चिमेकडील गौरी पाडा परिसरातील भाजप नगरसेवक दया गायकवाड यांच्या कार्यालयातील सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसतं आहे की, एक तरुणी कार्यालयात येते. दया गायकवाड यांच्यासोबत चर्चा सुरु करते. त्यानंतर त्यांच्याकडून पैशांचे बंडल घेऊन बॅगेत टाकते. त्याआधी सीसीटीव्ही बंद करण्याचे प्रयत्नही तरुणी करते. मात्र माझा कोणी काय करणार असे बोलून तिचे पैशांचे बंडल दाखवते आणि तरुणी निघणार, तोच पोलिस येतात.

धक्कादायक म्हणजे, या तरुणीने 2017 साली दया गायकवाड यांच्या विरोधात बलात्कारचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. गायकवाड यांची काही महिन्यांपूर्वी निर्दोष सुटका झाली आहे. त्यानंतर ही तरुणी त्यांना परत बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पैशांची मागणी करत होती. दया यांनी याबाबत खडकपाडा पोलीस स्थानाकात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी ठाण्यात राहणाऱ्या या तरुणीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.