तुम्हाला विकसित भारत देऊन जाणारे, पंतप्रधान मोदींचं मुंबईच्या सभेत वचन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत जाहीर सभा झाली. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी आज सभा घेतली. या वेळी मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील या सभेत भाषण केलं. मोदींनी आपल्या भाषणात अनेक मुद्दांवर भाष्य केले आणि काँग्रेसवर ही टीका केली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवतिर्थावर सभा घेतली. या जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. महत्त्वाचे म्हणजे या सभेला पंतप्रधान मोदींसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही मंचावर होते. राज ठाकरे यांनी देखील पंतप्रधान मोदींच्या आधी भाषण केले. यावेळी त्यांनी काही मागण्या देखील केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेला येण्यापूर्वी चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. तसेच वीर सावरकर स्मारक येथे वीर सावरकरांना आदरांजली वाहिली.
जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही या सेवकाला काम दिल्याने आज देशाची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5वी आर्थिक शक्ती बनला आहे. आज भारतात विक्रमी गुंतवणूक येत आहे. पण जेव्हा मी पुढच्या वेळेस येथे येईल तेव्हा आपण जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनलेली असेल. मी हमी देतो की मी तुम्हाला विकसित भारत देणार आहे. म्हणूनच मोदी 2047 साठी 24 तास आणि 7 दिवस. प्रत्येक क्षण तुमच्या नावाने, प्रत्येक क्षण देशाच्या नावाने मंत्रोच्चार करत आहेत.
मोदींचा काँग्रेसवर निशाणा
गांधीजींच्या सल्ल्याने स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित झाली असती तर आज भारत किमान पाच दशकांनी पुढे गेला असता, असे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर भारतातील सर्व व्यवस्थांमध्ये काँग्रेसीकरणामुळे पाच दशके देशाची नासधूस झाली आहे.
‘आज रामलला भव्य मंदिरात बसले आहेत’
पंतप्रधान मोदी म्हणाले की, राम मंदिर देखील अशक्य वाटत होते, पण एक दिवस जगाला हे सत्य स्वीकारावे लागेल की भारतात राहणारे लोक त्यांच्या विचार आणि हेतूने इतके मजबूत होते की ते 500 वर्षे एक स्वप्न घेऊन लढत राहिले. अनेक पिढ्यांचा संघर्ष, लाखो लोकांचे बलिदान आणि 500 वर्षे जपलेले स्वप्न यामुळे आज रामलला भव्य मंदिरात विराजमान आहेत.
‘कोणतीही शक्ती 370 परत आणू शकत नाही’
मोदी पुढे म्हणाले की, निराशेच्या गर्तेत बुडालेले हे लोक आहेत. ज्यांना कलम ३७० हटवणे अशक्य वाटत होते. कलम 370 ची जी भिंत आपल्या डोळ्यांसमोर होती, ती आपण स्मशानात पुरली. यापुढे कोणतीही शक्ती कलम 370 परत आणू शकणार नाही. तुम्ही मोदीला बळ द्या. कारण तुमचे एक मत राष्ट्रहिताच्या मोठ्या निर्णयांचा आधार बनेल. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे आहे.
