मोठी बातमी ! ज्ञानेश कुमार यांना घाम फुटणार… ठाकरे बंधू एकटवले; राज-उद्धव ठाकरेंचा 4 ऑक्टोबर रोजी महामोर्चा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत महामोर्चाची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने 'एसआयआर'च्या नावाखाली मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कॉकरोच जनता पार्टीनेही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मोठी बातमी ! ज्ञानेश कुमार यांना घाम फुटणार... ठाकरे बंधू एकटवले; राज-उद्धव ठाकरेंचा 4 ऑक्टोबर रोजी महामोर्चा
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 2:22 PM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना घाम फोडणारी बातमी आहे. एकीकडे कॉकरोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमार यांना अल्टिमेटम दिलेला असतानाच दुसरीकडे ठाकरे बंधुंनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दंड थोपाटले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महामोर्चाचं आयोजन केलं आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत हा मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टवरून दिली आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये निवडणूक आयुक्तांविरोधात मोर्चा काढण्याची चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. हा मोर्चा एका पक्षापुरता न राहता तर तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी सर्व राजकीय पक्षांना या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

काय आहे पोस्ट?

देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे, त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या 4 ऑक्टोबर 2026 ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत. अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा. बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया ! या , देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या, असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

कॉकरोचचं आंदोलन

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी कालच ट्विट करून ज्ञानेश कुमार यांना अल्टिमेटम दिला होता. 2 ऑक्टोबरच्या आधी राजीनामा द्या, अन्यथा आम्ही मुंबईत मोठं आंदोलन करू, असा इशारा दीपके यांनी दिला होता. दीपके यांनी मुंबईतच नव्हे तर हे आंदोलन देशातील इतर शहरांमध्ये नेणार असल्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे आधीच नीटच्या मुद्द्यावरून मोदी सरकारविरोधात देशातील जनतेत असंतोष असतानाच आता ज्ञानेश कुमार प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकार ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करणार, त्यांना जायला सांगणार की त्यांना अभय देणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us