उल्हासनगरमध्ये ‘हेडफोन’ सत्संग

उल्हासनगरमध्ये ‘हेडफोन’ सत्संग

अजय शर्मा, टीव्ही 9 मराठी, मुंबई : ध्वनी प्रदूषण टाळा, असं पोलिसांकडून वारंवार सांगितलं जातं. यासंबधी कायदेही आहेत. तरीही अनेकदा त्याचं सर्रासपणे उल्लंघन केलं जातं. पण उल्हासनगरात एक वेगळंच दृश्य बघायला मिळत आहे. उल्हासनगरात ध्वनीप्रदूषण टाळत एक अनोखं सत्संग सुरू आहे. हे सत्संगमध्ये चक्क हेडफोनवर होत असतं.

जवळपास 20 हजार भाविकांची गर्दी असलेल्या या संत्सगमध्ये ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी एक अनोखी शक्कल लढविण्यात आली. ध्वनीप्रदूषण होऊ नये म्हणून हेडफोन्सवर हे सत्संग करण्यात आले. उल्हासनगरच्या गोल मैदानात सप्टेंबर महिन्यापासून 40 दिवस अमृत वेला परिवाराचा हा सत्संग चालतो. या सत्संगची वेळ पहाटे पावणेचार ते पाच असते.

 

 

या मैदानाच्या चारही बाजूंना रहिवासी भाग असल्यामुळे इतक्या पहाटे स्पीकर्स लावून सत्संग करणे शक्य नसते. कारण त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो. तर स्पीकर्समुळे ध्वनीप्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होतं. हे टाळण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून या सत्संगमध्ये विशेष हेडफोन्सचा वापर करण्यात येत आहे. समोरच्या भव्य स्टेजवर शीख समुदायाचे संत भाईसाहब भजन आणि प्रवचन करतात, त्यांना वाद्यांचीही साथ असते. त्यांचे भजन हे हेडफोन्सच्या माध्यमातून थेट भाविकांच्या कानात पडतं. भाविकही हेडफोन घालून सत्संगात तल्लीन होऊन जातात. हे हेडफोन्स घालून सत्संगात सहभागी झाल्यानंतर आधीपेक्षा अधिक आनंददायी अनूभव येत असल्याचं भाविक सांगतात.

मंडपातच बसलेल्या भाविकांनाच नाही, तर जगभरात अमृत वेली परिवाराच्या जवळपास 25 लाख अनुयायी आणि भाविकांना हा सत्संग थेट पाहता येण्याचीही व्यवस्था येथे केली जाते.

हा आगळावेगळा सत्संग 23 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. गुरु गोविंद सिंह यांचा जन्मसोहळा याठिकाणी होणार असून या सोहळ्याला जवळपास एक लाख भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र इतकी प्रचंड गर्दी होऊनही इथं कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. त्यामुळं अमृत वेली परिवाराची शिस्त आणि त्यांच्याकडून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी लढवण्यात आलेली ही अनोखी शक्कल, इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI