
तिसरी मुंबई म्हणून वसई विरार नालासोपारा हा परिसर उदयास येत आहे. या परिसरात सर्वच बहुभाषिक, बहुप्रांतीक लोक या परिसरात राहतात. मात्र “मै हिंदी बोलेगा, भोजपुरी बोलेगा, मगर मराठी नहीं बोलेगा!” असा एक रिक्षाचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर काल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पकडून चांगलाच धडा शिकवला आहे. मराठी भाषेचा अपमान केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती आणि त्याचे पडसाद अखेर रस्त्यावर उमटले.
रिक्षाचालकाचा उर्मटपणा
ही घटना शनिवारी सायंकाळी विरार स्टेशन परिसरात घडली. चार दिवसांपूर्वी या रिक्षाचालकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो मराठी भाषा बोलण्यास स्पष्ट नकार देत “हिंदी बोलूंगा, तुझे क्या करना है?” अशा उद्धट शैलीत मराठी भाषेला दूषणे देत होता. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि मराठी प्रेमींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.
मुजोरी करू नका
या घटनेच्या नंतर विरार स्थानकातील काही रिक्षाचालक, स्वीट मार्ट दुकानदार, ग्राहक यांच्याही प्रतिक्रिया घेतल्या नंतर त्यांनी मात्र स्पष्ट सांगितले आहे की, महाराष्ट्रात धंदा करतोत तर मराठी आलीच पाहिजे, हिंदी येत नसेल प्रयत्न केले पाहिजेत, पण मुजोरगीर नाही, आणि मुजोरगीरी केली तर चोप बसणारच आशा संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
मग मागितली माफी
अगोदर शिरजोरी करणारा हा रिक्षा चालक मनसैनिक आणि शिवसैनिकांनी चोप दिल्यावर वठणीवर आला. त्याच्या उर्मटपणाचा जाब विचारल्यावर त्याने माफी मागितली. आपण असे पुन्हा वागणार नाही असे तो म्हणाला. मराठी शिकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तो म्हणाला. मराठी येत नसेल पण निदान तिचा अपमान तरी करू नका अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. अनेक परप्रांतियांनी सुद्धा रिक्षाचालकाच्या उर्मटपणाचे समर्थन करता येत नसल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हिंदी लादण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यातच तिसरी भाषा म्हणून राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आणि प्रचंड विरोधानंतर तो मागे घेतला. सरकारविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 18 वर्षांनी एकाच मंचावर आले.