प्रतिक्षा संपली, मुंबईत टेस्लाचे पहिले शो-रूम; ही सुपरकार होणार लाँच?
Elon Musk Tesla Car : टेस्लाच्या कार भारतीय रस्त्यावर धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एलॉन मस्क यांची प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी मुंबईत देशातील पहिले शो-रुम सुरू करत आहे. त्यामुळे कार प्रेमी आनंदात आहेत.

अमेरिकेची प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला अखेर भारतात दाखल होत आहे. या कंपनीचा भारतातील प्रवेश काही दिवसांपासून लांबला होता. सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरचा फटका सर्वच देशांना बसला आहे. त्यात भारतात टेस्लाची एंट्री ही मोठी घडामोड मानण्यात येत आहे. या 15 जुलै रोजी मुंबईत देशातील पहिले शो-रुम सुरू होत आहे. या शो-रुममध्ये ग्राहकांना टेस्लाच्या दमदार इलेक्ट्रिक कार जवळून पाहता येतील. या आलिशान कारची टेस्ट ड्राईव्ह मिळण्याची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे कार प्रेमींमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
कुठे आहे शो-रूम?
अवघ्या दोन दिवसांनी ग्राहक टेस्लाच्या कारची टेस्ट ड्राईव्ह ग्राहकांना घेता येईल. भारतात केवळ शो-रुम उघडण्यापर्यंत टेस्लाची भूमिका नाही. तर भारतीय बाजारात मोठी खळबळ उडवण्याची कंपनीची तयारी असल्याचे बोलले जात आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहन बाजाराला नुकतीच सुरुवात झाली आहे. टेस्ला ही लक्झिरियस, आलिशान इलेक्ट्रिक कारच भारतात विकणार की सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सुद्धा कार आणणार यावर खल होत आहे. टेस्लाने बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक कार आणली तर इतर भारतीय कंपन्यांसाठी ते मोठे आव्हान ठरेल.
15 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये या शोरूमचे उद्धघाटन होईल. हे मुंबईतील एक प्रिमियम लोकेशन आहे. ॲप्पलचे स्टोअर सुद्धा याच मॉलमध्ये आहे. या मार्च महिन्यात टेस्लाने येथे जवळपास 4000 चौरस फूट जागा भाडेपट्ट्यावर घेतली आहे. या सेंटरवर आता गर्दी उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय घेता येईल अनुभव?
या एक्सपीरियन्स सेंटरमध्ये ग्राहकांना टेस्लाच्या कार केवळ जवळून बघता येतील असे नाही तर ते टेस्ट ड्राईव्ह सुद्धा घेऊ शकतील. येथे ग्राहकांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी अनेक फीचर्स सुद्धा उपलब्ध आहेत. इंटरॲक्टिव्ह स्क्रीन आणि डिस्प्लेच्या माध्यमातून त्यांना कारची माहिती मिळेल. हे सेंटर केवळ इलेक्ट्रिक कारचे शोरूम नाही. येथे ग्राहकांना मॉडल 3, मॉडल Y, मॉडल S, मॉडल X आणि भविष्यातील सायबरट्रकची माहिती मिळेल. याशिवाय ग्राहकांना टेस्लाचे सौरऊर्जा उत्पादन दिसतील. सोलर पॅनल, पावरवॉल, सोलर रुफ हे पण पाहायला मिळतील. इलेक्ट्रिक कारची टेस्ट ड्राईव्ह सुद्धा घेता येईल.
