मुंबईत चालकरहित स्वदेशी मेट्रो चालणार? एकनाथ शिंदेंकडून बंगळुरुत पाहणी

मुंबईत चालकरहित स्वदेशी मेट्रो चालणार? एकनाथ शिंदेंकडून बंगळुरुत पाहणी

त्यानंतर मे 2021 पासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत मेट्रो दाखल होईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. (Metro without driver ready for arrival in Mumbai)

Namrata Patil

|

Jan 19, 2021 | 3:59 PM

बंगळुरु : लाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील, स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टाँक) निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (19 जानेवारी) बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी मेट्रो गाडी आणि तिच्या निर्मितीच्या कामांची प्रत्यक्ष पाहाणी केली. (Indigenous Metro without driver ready for arrival in Mumbai Eknath Shinde Visit Bangalore)

येत्या 22 जानेवारीला पहिली मेट्रो गाडी मुंबईच्या दिशेने दाखल होणार आहे. तब्बल सात वर्षानंतर मुंबई नवीन मेट्रोच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे तिच्या ‘फर्स्ट लुक’बाबत मुंबईकरांमध्ये उत्सुकता आहे. ही मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या आघाड्यांवर चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मे 2021 पासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत मेट्रो दाखल होईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

2014 मध्ये घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर मुंबई शहरातील पहिली मेट्रो धावली. सात वर्षानंतर दहिसर ते डी. एन. नगर (दोन अ) आणि अंधेरी पूर्व ते दहिसर (सात) या मार्गावरील प्रवासी सेवा सुरु होणार आहे. ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका आणि स्टेशन्स उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या निर्मितीचे काम ‘बीईएमएल’कडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे स्वदेशी बनावटीची ही पहिलीच मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रो दोन अ आणि सात या मार्गिकांवर धावणारे पहिल्या टप्प्यातील कोच 22 जानेवारीला बंगळुरूहून मुंबईच्या दिशेने रवाना होतील. त्यानंतर 27 जानेवारीपर्यंत हे कोच चारकोप मेट्रो कारशेडमध्ये दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर आवश्यक असलेल्या तांत्रिक आणि अन्य तपासण्या करून पुढील दोन महिन्यांत या मेट्रोच्या ट्रायल रन्स घेतल्या जातील. यानंतर मे, 2021 पासून या मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

🛑मेट्रोच्या कोचची वैशिष्ट्यं🛑

💠या मेट्रोचे सर्व कोच एसी आहेत. त्यात ऑटोमॅटीक (स्वयंचलित) दरवाजे आहेत. पॅसेंजर अनाऊंसमेंट आणि पॅसेंजर इन्फर्मेशन व्यवस्था कार्यरत आहे.

💠प्रवासी ये-जा करताना घसरून पडू नये यासाठी या डब्यांचा अंतर्गत पृष्ठभाग हा अँटी स्किडींग करण्यात आला आहे.

💠प्रत्येक डब्यात फायर फायटिंग आणि अन्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा आहे.

💠या मेट्रोचा प्रत्येक डब्यात आणि प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्हीची नजर असेल.

💠प्रवाशांना मदत मागण्यासाठी प्रत्येक डब्यात एक स्विचही देण्यात आला आहे.

💠पर्यावरणाचे संवर्धन आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी सध्या सायकल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मेट्रोच्या प्रत्येक डब्यात दोन सायकल ठेवण्याची व्यवस्थासुद्धा आहे.

💠अपंग बांधवांना आपल्या व्हीलचेअरसह प्रवास करता यावा, यासाठी प्रत्येक डब्यात स्वतंत्र व्यवस्था आहे.

💠या मेट्रो मार्गिकेवरील प्रत्येक ट्रेनची कमाल वेग मर्यादा 80 किमी प्रति तास असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मेट्रोला मोटरमन नसेल.

💠चालकरहीत (अन अटेंडेड ट्रेन ऑपरेशन) मेट्रो स्वयंचलित पद्धतीने धावणार आहे.

💠पण प्रवाशांना असुरक्षित वाटू नये, यासाठी सुरुवातीला मोटारमनसह या ट्रेन धावतील. त्यानंतर स्वयंचलित पद्धतीने त्यांची ये-जा सुरू होईल.

💠 वेग नियंत्रण आणि सुरक्षेसाठी अद्ययावत व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी (व्हीव्हीव्हीएफ), ट्रेन कंट्रोल अँण्ड मँनेजमेंट सिस्टिमसह विविध प्रकारचे अद्ययावत तंत्रज्ञान या यंत्रणेत आहे.

💠इंटरनेटच्या वापरासाठी प्रत्येक डब्यात ऑप्टिकल फायबरचे नेटवर्कही आहे. या डब्यांचे डिझाईन ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य देणारे असून वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला जाईल.

परदेशी मेट्रोपेक्षा किफायतशीर

बीईएमएल येथे तयार होत असलेल्या प्रत्येक कोचसाठी सरासरी 8 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोचच्या निर्मितीसाठी सरासरी 10 कोटी रुपये खर्च येतात. त्यामुळे ही कोच निर्मिती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरलेली आहे. या दोन्ही मार्गिकांसाठी 378 कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत. प्रत्येत ट्रेन ही 6 कोचची असून एकूण 63 रेक या मार्गावर मुंबईकरांना सेवा देतील.

प्रत्येक कोचमध्ये 52 प्रवाशांची आणि 328 प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था आहे. एका डब्यात सुमारे 380 जणांचा प्रवास शक्य असून एका ट्रेनची प्रवासी क्षमता 2280 इतकी आहे. या कोचच्या निर्मितीसाठी एकूण 3015 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या मार्गावर आता 96 ट्रेन कार्यान्वितत करण्याचे नियोजन आहे. या एकूण कोचची संख्या त्यामुळे 576 पर्यंत वाढणार आहे. पहिल्या सहा ट्रेन येत्या सहा महिन्यांत दाखल होतील. त्यानंतर दर महिन्याला तीन याप्रमाणे उर्वरित ट्रेन पुढल्या तीन वर्षांत येतील.

मुंबई महानगरातील सुखकर प्रवासी सेवेसाठी कटिबद्ध

पुढील पाच वर्षांत मंबई महानगर क्षेत्रात जवळपास ३४० किमी लांबीचे मेट्रो जाळे विस्तारण्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. मुंबई आणि सभोवतालच्या शहरांतील प्रवासी सेवा त्यामुळे भक्कम होईल. मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनला सक्षम पर्याय मिळेल. या शहरांतील लाखो रहिवाशांचा दैनंदिन प्रवास त्यामुळे सुखकर होईल. मार्च महिन्यानंतर कोरोना संक्रमणामुळे कामांचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र, आता ही कामे पुन्हा जोमाने सुरू झाली असून निर्धारित वेळेत ती पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Indigenous Metro without driver ready for arrival in Mumbai Eknath Shinde Visit Bangalore)

संबंधित बातम्या : 

मुंबईत रेल्वे रुळावरील प्रवाशांच्या बळीवर कोरोनाने लावला ब्रेक, गेल्या वर्षीच्या तुलनेत 65 टक्के घट

कोव्हिड लसीकरणातील Co- win ॲप आजपासून पुन्हा अ‌ॅक्टिव्ह, शुभारंभावेळीच अ‌ॅप झालं होतं डाऊन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें