कर्जतमध्ये झाडं तोडण्याऐवजी तुम्ही मराठवाड्यात…राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांनी सुचवला बेस्ट पर्याय
NCP on Karjat Bhimashankar Tree Cutting: कर्जत भीमाशंकर येथील जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जात असताना सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने सुद्धा त्याला विरोध केला आहे. सरकारची पहिली कोंडी झाली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीने सरकारला एक बेस्ट पर्याय सुचवला आहे.

NCP on Karjat Bhimashankar Tree Cutting: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर, कोतवाल आणि खलाटी परिसरात गुजरातमधील टॉरेंट पॉवरचा जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी 32 हजारांहून अधिक झाडांची कत्तल होणार आहे. त्यावरून आता पर्यावरणप्रेमी, विरोधक आणि आसपासच्या गावातील नागरीक संतापले आहे. महाविकास आघाडीने त्याला कडाडून विरोध केला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उद्या या परिसराला भेट देणार आहे. त्याचवेळी आता सत्तेतील दादांच्या राष्ट्रवादीने सुद्धा या बेसुमार वृक्षतोडीविरोधात सूर आळवला आहे. कर्जत भीमाशंकर येथील जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जात असताना सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने सुद्धा त्याला विरोध केला आहे. राष्ट्रवादीने सरकारला एक बेस्ट पर्याय सुचवला आहे.
राष्ट्रवादीचा विरोधी सूर
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी या बेसुमार वृक्षतोडीला विरोध केला आहे. एकीकडे आपण घोषणा देतो वृक्ष लावा म्हणून तर दुसरीकडे आपण वृक्षतोड करतोय हे काय योग्य नाही. वृक्ष तोड करणे हे चुकीचे आहे, टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी वृक्ष तोड होत आहे. मराठवाड्यात हा प्रोजेक्ट करता येतो का याचा विचार करायला हवा, कारण तिकडे वृक्षतोड होणार नाहीत. आपण सध्या दुष्काळाला सामोरे जात आहोत. या संकटला आपण सामोरे जात असताना निसर्गाची हानी होऊ नये. तिकडे होणाऱ्या या प्रकल्पाला माझा विरोध आहे. हाच प्रकल्प दुसरीकडे राबवला पाहिजे. हा प्रोजेक्ट दुसरीकडे करावा अशी विनंती आम्ही करू. पक्षाचा प्रवक्ता म्हणून आणि निसर्ग प्रेमी म्हणून मी माझी भूमिका मांडली, माझा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका चव्हाण यांनी मांडली.
९ महिन्यात तपास कुठपर्यंत आला?
उद्या दादांच्या विमान अपघाताला ९ महिने पूर्ण होईल. या ९ महिन्यात तपास कुठपर्यंत आला? अनेक प्रश्न तपासाबाबत विचारले जात आहे. लवकरात लवकर याचा अहवाल सादर करावा म्हणून आम्ही फडणवीस साहेबांची भेट घेऊ. अन्यथा आम्ही राष्ट्रवादी म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करू. दादा यांचा घात की अपघात? हे सत्य लवकर बाहेर आले पाहिजे. पोलीस खाते काय करत आहे? पोलिसांकडे सध्या काय काम आहे? लोकांनी डॉक्युमेंटरी पोस्ट केली की ती पोस्ट डिलीट करा हे सांगण्यात सध्या ते व्यस्त आहेत का? अशी परखड टीकाही चव्हाण यांनी केली.