कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान स्क्रिप्टेड, यामागे मोठं षडयंत्र, पण… संजय राऊत यांचा दावा

| Updated on: Nov 25, 2022 | 10:39 AM

महाराष्ट्राची एक इंच भूमी आम्ही देऊ देणार नाही. सरकार सोडून द्या, तुमच्यात हिंमत नाही. तुम्ही दुबळे आहात. शिवसेना आहे इथे. आणखी हुतात्मे द्यावे लागले तरी देऊ.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान स्क्रिप्टेड, यामागे मोठं षडयंत्र, पण... संजय राऊत यांचा दावा
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान स्क्रिप्टेड, यामागे मोठं षडयंत्र
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानामागे मोठं षडयंत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाचा मुद्दा मागे पडावा म्हणून बोम्मईंना सीमावादाची स्क्रिप्ट लिहून दिली आहे. पण शिवसेना खंबीर आहे. आम्ही शिवाजी महाराजांच्या अवमानावर आवाज उठवणारच. उद्धव ठाकरे यांनी तर लढाईची घोषणाच केली आहे. त्यामुळे आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. मीडियाशी संवाद साधताना ते बोलत होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रावर अचानक हल्ला केला. मी त्याला हल्ला म्हणतो. युद्ध म्हणतो. यामागे फार मोठं कारस्थान आणि षडयंत्र आहे. महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांकडून महाराजांचा अपमान झाला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराजांवर चिखलफेक केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. सरकार विरोधात संताप आहे. त्यावरचं लक्ष विचलीत व्हावं म्हणूनच बोम्मईंना पुढे केलं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून बोम्मईंना पुढे करून महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगितला. म्हणजे लोकांनी दुसऱ्या विषयाकडे वळावं आणि महाराजांचा अपमान विसरावा हा त्यामागचा हेतू आहे. त्रिवेदी आणि राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्यामुळे लोकांच्या मनात चिड आहे. लोकांचं ध्यान हटवण्यासाठी बोम्मईला पुढे केले आहे. हे स्क्रिप्टेड आहे.

पण आम्ही हा अपमान विसरणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही. हे खोके सरकार आहे. यांना खोके दिले तर हे लोक गप्प बसतील. महाराष्ट्राला विसरतील. पण शिवसेना विसरणार नाही, असंही ते म्हणाले.

हे सर्व स्क्रिप्टेड आहे. नाही तर भाजपचा मुख्यमंत्री दुसऱ्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका कशाला करेल? देशभरात असं कधी पाहिलंय का? योगींनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यावर टीका केली. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यावर टीका केली असं कधीच होत नाही.

भाजप ही शिस्तबद्ध पार्टी आहे. हे ठरलेलं स्क्रिप्ट आहे. लोकांचा संताप कमी करण्यासाठी, महाराजांच्या अपमानाचा विषय बाजूला पाडण्यासाठी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेलं स्क्रिप्ट आहे, असा दावा त्यांनी केला.

जेव्हा राज्यपालांनी मुंबई, ठाण्यातील मराठी माणसाचा अपमान केला, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं राज्यपाल म्हणाले. तेव्हा गोंधळ झाला. तेव्हा या विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊतांना अटक झाली. हे स्क्रिप्टेड होतं.

आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान विसरावा म्हणून सीमाभागाचा वाद उकरून काढला आहे. तुम्ही कितीही कारस्थाने केली तरी महाराष्ट्र गप्प बसणार नाही. उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले आहे. आता लढाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.

महाराष्ट्राची एक इंच भूमी आम्ही देऊ देणार नाही. सरकार सोडून द्या, तुमच्यात हिंमत नाही. तुम्ही दुबळे आहात. शिवसेना आहे इथे. आणखी हुतात्मे द्यावे लागले तरी देऊ. एक इंच काय एक वितभर जागाही देणार नाही.

महाभारत याच गोष्टीमुळे घडलं. महाराष्ट्राचं नवं महाभारत याच गोष्टीमुळे घडू शकतं, असा इशारा देतानाच महाराष्ट्रात कोणीही कर्नाटकाचे लोक नाही. महाराष्ट्राच्या बॉर्डवर अनेक लोक विविध भाषा बोलतात. तेलगूही बोलतात. कानडीही बोलतात. पण ते सर्व महाराष्ट्रीयन आहेत, असंही त्यांनी सांगितलं.