पहिल्या शेतकरी आत्महत्येचं कारण तुम्हाला माहिती आहे? का शेकडो किसानपुत्र आज दिवसभरासाठी अन्नत्याग करतायत? वाचा सविस्तर…

शेतकरी विरोधी कायदे हटवा या मागणीसाठी किसानपुत्र आंदोलनाची सुरुवात झाली आणि ती आता एक चळवळ झालेली आहे.

पहिल्या शेतकरी आत्महत्येचं कारण तुम्हाला माहिती आहे? का शेकडो किसानपुत्र आज दिवसभरासाठी अन्नत्याग करतायत? वाचा सविस्तर...
अमर हबीब (किसानपुत्र आंदोलन)
Akshay Adhav

|

Mar 19, 2021 | 11:02 AM

मुंबई : आज 19 मार्च. दरवर्षी याच दिवशी किसानपुत्र आंदोलन महाराष्ट्राला एक दिवसाचं अन्नत्याग करण्याचं आवाहन करतं आणि त्याला गेल्या काही वर्षात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शेतकरी विरोधी कायदे हटवा या मागणीसाठी किसानपुत्र आंदोलनाची सुरुवात झाली आणि ती आता एक चळवळ झालेली आहे. (Kisanputra Andolan Fasts for First farm Suicide in Maharashtra)

त्या 19 मार्चला नेमकं काय घडलं होतं?

गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातले शेकडो किसानपूत्र 19 मार्चला एक दिवसाचा अन्नत्याग करतात. पण 19 मार्चच का? असा सवाल तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे, पहिली शेतकरी आत्महत्या. यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाणचे शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबासह विष घेऊन आजच्याच दिवशी आत्महत्या केली होती. ते साल होतं 1986. त्या दिवशी साहेबराव करपे, पत्नी आणि चार मुलांना घेऊन विनोबांच्या पवनारला गेले. परत आले. रात्री जेवण तयार केले. त्यात विष कालवले, सर्व मुलांना जेवू घातले, स्वत: केले आणि  मृत्यूला कवटाळले. साहेबरावांची सहकुटुंब आत्महत्या ही फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातली पहिली सामुहिक शेतकरी आत्महत्या मानली जाते. त्यानंतर जवळपास 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. लाखो कुटुंब देशोधडीला लागली. अलिकडे तर शेतकऱ्यांच्या मुली आत्महत्या करतायत जे चिंताजनक आहे.  हा सर्व शेतकरीविरोधी सरकारी धोरणाचा परिणाम असल्याचं किसानपूत्र आंदोलनाची धारणा आहे. पक्ष कुठलाही असो, सरकार कुणाचेही असो पण शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत हे महाराष्ट्राचं जळजळीत वास्तव.

किसानपुत्र आंदोलन

किसानपुत्र आंदोलन

काय आहे किसानपुत्र आंदोलन?

किसानपूत्र आंदोलन ही एक सामाजिक-राजकीय चळवळ आहे. यात कुणाच्याही सहभागाला बंधन नाही. म्हणजे तुम्ही किसानपूत्र आंदोलनाचा भागही होऊ शकता आणि स्वतंत्र राजकीय भूमिकाही मांडू शकता. गेल्या काही काळात महाराष्ट्रात या आंदोलनात शेकडो किसानपूत्र सहभागी झालेत. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार अमर हबीब (Amar Habib) यांनी ह्या आंदोलनाची सुरुवात केली आणि बघता बघता ती पूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे. किसानपूत्र आंदोलनाची मुख्य मागणी आहे शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची. (Abolish anti farm laws ) ह्या आंदोलनाचा तसा कुणी नेता नाही, कार्यकारीणी नाही की कुठे अधिकृत अशी राजकीय पक्ष, संघटनेसारखी नोंदणी किंवा बांधणी नाही. तुम्हाला शेतकऱ्यांविषयी तळमळ आहे, काम करायचं आहे तर तुमचं आंदोलनात स्वागत आहे.

किसानपुत्र आंदोलन

किसानपुत्र आंदोलन

40 एकरच्या मालकाची सामूहिक आत्महत्या

अनेकांचा असा समज आहे की, ज्याच्याकडे जमीन जास्त असते तो श्रीमंत शेतकरी. पण तो समज खोटा असल्याचं अनेक उदाहरणावरुन दिसून आले आहे. खुद्द साहेबराव (Sahebrao Karpe) हे 40 एकर जमीनीचे मालक होते. गावात त्यांचा मोठा वाडा होता. गावचे ते 11 वर्षे सरपंच होते. पंधरा एकरावर गहू, चणा होता. भजन किर्तन करणाऱ्या साहेबरावांनी कुटुंबासह आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या कशी केली, का केली, याची सविस्तर चिठ्ठीही लिहिली. थकीत बिलापोटी एमएसईबीनं वीज कनेक्शन तोडलं आणि डोळ्यासमोर गहू, चणा वाळला.  त्यातूनच अख्खं कुटुंब संपलं. गेल्या 35 वर्षात अशी अनेक कुटुंब कायमची संपलीत. हे सर्व सरकारी धोरणांच्या हत्या असल्याचा आरोप विविध शेतकरी संघटना, नेत्यांनी वेळोवेळी केला आहे.

किसानपुत्र आंदोलन

किसानपुत्र आंदोलन

ते शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करा

किसानपूत्र आंदोलनाचा तीन कायद्यांना विरोध आहे.  कमाल शेतजमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तुंचा कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा. या तीन कायद्यांमुळेच शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. हेच कायदे शेतकऱ्यांचा गळफास ठरत असल्याचं आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. हे तीन कायदेच कसे शेतकऱ्यांचा जीव घेतायत हे सांगण्यासाठी अमर हबीब यांनी सविस्तर पुस्तिकाही लिहिली आहे. त्याचं नाव शेतकरी विरोधी कायदे. हे तीन कायदे रद्द करावेत म्हणून किसानपूत्र आंदोलनाच्या वतीनं सुप्रीम कोर्टातही लढाई सुरु आहे. अलिकडेच सुप्रीम कोर्टानं दिल्ली शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जी कमिटी नेमलीय तिच्याकडेही या तीन कायद्याविरोधात आंदोलनानं आवाज उठवला आहे. किसानपूत्र आंदोलनाचाच परिणाम म्हणून मोदी सरकारनं आवश्यक वस्तू कायद्यात काही बदल केलेत. ते पुरेसे नसल्याचं किसानपूत्र आंदोलनाचं म्हणनं आहे. विशेष म्हणजे मोदी सरकारनं अलीकडेच ज्या शेतकरी कायद्यात सुधारणा केल्यात त्याचं किसानपूत्र आंदोलनानं स्वागत केलं आहे. एवढ्याच सुधारणांवर न थांबता वरील तीन कायदे हटवा अशी मागणीही आंदोलनाने केली आहे.

औंढा नागनाथ ते चिलगव्हाण सहवेदना यात्रा

किसानपूत्र आंदोलनाच्यावतीनं यावर्षी औंढा नागनाथ ते चिलगव्हाण अशी सहवेदना यात्रा काढली आहे. ही यात्रा 11 मार्चला औंढ्यातून निघून 19 मार्चला चिलगव्हाणमध्ये पोहोचली. यात राजीव बसरगेकर, हनुमंतराव पाटील, राम किशन आप्पा रुद्राक्ष, सुभाष कच्छवे अशा काही किसानपूत्रांनी भाग घेतला. त्यासाठी त्यांनी विदर्भ मराठवाड्यातल्या सध्याच्या तळपणाऱ्या उन्हाची पर्वाही केली नाही. रस्त्यात लागलेल्या अनेक गावांमध्ये शेतकरीविरोधी कायद्यांवर चर्चा झाली तसच करपे कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त केली गेली. आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब हे स्वत: चिलगव्हाणमध्ये दिवसभर अन्नत्याग करत आहेत. सोबतच महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात किसानपूत्र ह्या आंदोलनाचा भाग म्हणून आज एक दिवसाचा उपवास करत आहेत.

(Kisan putra Andolan Fasts for First farm Suicide in Maharashtra)

हे ही वाचा :

वाझे प्रकरणात जप्त कारचे मूळ मालक शिवसेना पदाधिकारी, दोन वर्षांपूर्वीच गाडी विकल्याचा दावा

13 वर्षीय विद्यार्थ्यासोबत विवाह, सुहागरात आणि वैधव्याचं नाटक, लग्न जुळवण्यासाठी शिक्षिकेचा उपद्व्याप

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें