Mumbai NCB Raid: समीर वानखेडे की नांगरे पाटील, ड्रग्ज पार्ट्या करणाऱ्यांचे कर्दनकाळ कोण? वाचा सविस्तर

| Updated on: Oct 03, 2021 | 4:50 PM

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने जहाजावर चाललेल्या ड्रग्ज पार्टीवर धाड टाकून मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. (vishwas nangare patil and sameer wankhede)

Mumbai NCB Raid: समीर वानखेडे की नांगरे पाटील, ड्रग्ज पार्ट्या करणाऱ्यांचे कर्दनकाळ कोण? वाचा सविस्तर
sameer wankhede
Follow us on

मुंबई: समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने जहाजावर चाललेल्या ड्रग्ज पार्टीवर धाड टाकून मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन यालाही एनसीबीने अटक केल्याने समीर वानखेडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तर यापूर्वी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही पुण्यात अशाच एका रेव्ह पार्टीवर कारवाई केली होती. त्यामुळे नांगरे-पाटीलही चर्चेत आले होते. त्यामुळे समीर वानखडे आणि विश्वास नांगरे-पाटील हे ड्रग्ज माफियांचे कर्दनकाळ असल्याचं मानलं जात आहे.

शाहरुखचा मुलगा ताब्यात

क्रूझवरील रेव्ह पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनसह 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये उद्योजकांच्या तीन मुलींचाही समावेश आहे. तसेच ताब्यात घेतलेल्यांची नावंही उघड झाली असून त्यापैकी दोघांची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. समीर वानखेडे आणि त्यांची टीम या पार्टीवर नजर ठेवून होते. इन्स्टावरून या पार्टीची जाहिरात देण्यात आली होती. त्यामुळे समीर वानखेडेंसह त्यांच्या टीमनेही या पार्टीत भाग घेऊन सापळा रचला होता. त्यानंतर ऐन पार्टी रंगात आलेली असताना आणि पार्टीतील तरुणांनी ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली असताना वानखेडे आणि त्यांच्या टीमने ताब्यात घेतलं. एनसीबीने 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकीन, 25 एमडीएमए ड्रग्जच्या टॅबलेट आणि 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.

रिया चक्रवतीचीही चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही वानखेडे यांच्या नेतृत्वात ड्रग्जच्या अँगलने एनसीबीने छापेमारी केली होती. त्यानंतर वानखेडे यांनी अनेकवेळा रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या मित्रांची चौकशी केली होती.

वानखेडे ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ

ड्रग्ज माफिया वानखेडेंच्या नावाने थरथर कापत असतात. त्यांनी यापूर्वीही अनेक ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे. वानखेडे कुणालाही दयामाया दाखवत नाहीत. अत्यंत शिताफिने सापळा रचून ते ड्रग्ज पार्ट्यांचा भांडाफोड करतात. शिवाय त्यांचे खबरी त्यांना अचूक माहिती देतात. त्यांना मिळालेली खबर ही पक्की खबरच असते. त्यामुळे वानखेडेंपासून ड्रग्ज माफिया नेहमी सतर्क राहत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

17,000 कोटींचे ड्रग्ज जप्त

वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने यापूर्वी 17,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केलेलं आहे. त्यांच्या कर्तव्य कठोरपणाचे अनेक किस्सेही प्रसिद्ध आहेत. ते अबकारी कर खात्यात कामाला होते. त्यावेळी काही बड्या हस्तींना त्यांनी क्लिअरन्स दिला नव्हता. विदेशी पैशातून वस्तू खरेदी केल्याचं जोपर्यंत या बड्या धेंडांनी कबूल केलं नाही तोपर्यंत त्यांना वानखेडे यांनी क्लिअरन्स दिला नव्हता.

पुण्यातील रेव्ह पार्टीवर नांगरे-पाटलांची कारवाई

वानखेडे यांच्या प्रमाणेच विश्वास नागंरे पाटलांनाही ड्रग्ज माफिया थरथर कापत असतात. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीसदलात अधीक्षक असताना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे नांगरे-पाटील प्रसिद्धीच्या झोतात आले. पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील शेतात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर 4 मार्च 2007 ला छापा टाकून 287 तरुण-तरुणींना (21 तरुणीं) अटक केली होती. प्रयोगशाळेत झालेल्या रासायनिक पृथक्करण अहवालानुसार त्यातील 249 जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले होते. या कारवाईमुळे नांगरे-पाटील यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

मुंबईतही रेव्ह पार्टीवर छापा

मुंबईत पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असतानाही त्यांनी एका रेव्ह पार्टीवर छापा मारला होता. यात बॉलिवूडच्या एका खलनायकाचा मुलगाही सापडला होता. मात्र, वैद्यकीय चाचणीनंतर या खलनायकाच्या मुलाला निर्दोष सोडण्यात आलं होतं. परंतु, त्या खलनायकाच्या मुलीला गेल्या वर्षीच एनसीबीने अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अंमली पदार्थांच्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते.

संबंधित बातम्या:

शाहरुखच्या मुलाचा फोन जप्त, चॅटमध्ये नेमकं काय?; कारवाईत अटक करण्यात आलेल्या त्या दोन महिला कोण?

मोठी बातमी : शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनवर कारवाई

मुंबईत नार्कोटिक्स ब्युरोची मोठी कारवाई; क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धाड, बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक?

(know about vishwas nangare patil and sameer wankhede who busted drug mafia)