अरण्यऋषी, ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचे निधन, नुकताच स्विकारला होता पद्मश्री पुरस्कार
महाराष्ट्रातील निसर्ग आणि जंगलावरील कांदबऱ्यांनी घराघरात पोहचलेले साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले आहे. सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरी बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ज्येष्ठ लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले आहे. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार स्विकारण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने ते आजारी होते. त्यांच्या निधनाने मराठीतील थोर साहित्यिक आणि पक्षीतज्ज्ञ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरी बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 30 मार्च रोजी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ते 93 वर्षांचे होते.
सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या घरात जन्मलेल्या चितमपल्ली यांना त्यांच्या जंगल आणि पक्ष्यांविषयीच्या अभ्यासामुळे अरण्यऋषी म्हणून ओळखले जात होते. वनाधिकारी म्हणून सरकारी नोकरी करतानाच त्यांनी वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांनी पक्षी कोष तयार करायला देखील स्वत:ला वाहून घेतले होते. एका ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाचा सन्मान यंदा पद्म पुरस्कारानं करण्यात आला होता.
मारुती चितमपल्ली यांनी सहा दशकांहून अधिक काळ मराठी लेखल, वन्यजीव संशोधन आणि पर्यावरण जागरुकता केली होती.त्यांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदीही भूषवले होते. वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर २० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली होती. मराठी आणि इतर भाषांमधील पक्षी, प्राणी (प्राणी कोश) आणि झाडे (वृक्ष कोश) आदी शब्दकोषांचे काम केले होते.
वन सेवा अधिकारी म्हणूनही योगदान
पक्षी जाय दिगंतरा (१९८१) आणि रानवाटा (१९९१) सारख्या उत्कृष्ट कलाकृती त्यांनी निर्माण केल्या होत्या. वन सेवा अधिकारी म्हणून ते नोकरी करीत होते. १९९० पर्यंत संचालक व्याघ्र प्रकल्प म्हणूनही काम करताना त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नागझिरा अभयारण्य आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान यासारख्या प्रमुख वन्यजीव अभयारण्यांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
