यांना पोरं झाले तरी म्हणतील संजय राऊतांमुळेच… संजय राऊतांचा घणाघात
प्रसाद लाड यांनी संजय राऊतांवर कथित क्लिप बनवल्याचा आरोप केला आहे. यावर राऊतांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. " उद्या आमच्यामुळेच त्यांना पोरं झाली असंही म्हणतील," अशा शब्दात त्यांनी भाजपच्या नेत्यांना सुनावले आहे. ही आरोपबाजी हास्यास्पद असून, भाजपला कोणताही काम नाही, असे राऊत म्हणाले.

मनोज जरांगेंकडे असलेली क्लिप ही संजय राऊत यांनीच बनवली आहे. उबाठाच्या वॉररुममध्ये ही क्लिप तयार करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. भाजपच्या लोकांना काही काम राहिलं नाही. त्या क्लिपमधील आवाज स्पष्ट कळत आहेत. उगाचच हे लोक काहीही बोलत आहेत. उद्या ते आणखी काहीही बोलतील. यांना पोरं झाली तर संजय राऊतांमुळेच झाली म्हणून बोंब करतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मी मनोज जरांगे यांचे आभार मानेल. त्यांनी एका मोठ्या प्रकरणाला वाचा फोडली. त्यांनी राजकारण्यांचा विद्रूप चेहरा देशासमोर आणला. त्यानंतर भाजपवाले जे बोलत आहे, ते हस्यास्पद आहे. मूर्खपणाचं आहे. संजय राऊत यांनी ही टेप तयार केली म्हणणं हे हस्यास्पद आहे. लोक त्यांना हसत आहेत. हे त्यांना कळत नाही. उद्या ते काहीही बोलू शकतात. यांना पोरं झाले तरी म्हणतील संजय राऊतांमुळे झाली. या लेव्हलला ही लोकं आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
यांची अक्कल आणि बुद्धी
टेप कुणाची? आतले आवाज कुणाचे? पण यांची अक्कल आणि बुद्धी या लेव्हलची आहे. त्यामुळे त्यांच्या अकलेवर भाजपची भिस्त म्हणजे माती आहे. या लोकांना मेंदू नाही. हा मातीचा गोळा आहे. पैसा आणि सत्ता आहे म्हणून हा मातीचा गोळा वळवळतोय. दिल्लीतील त्यांच्या बड्या नेत्यांचा मेंदूही चालत नाहीये, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
त्यांना भोकाड पसरायची सवय
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून देशात वाद निर्माण झाला आहे. त्याचं राऊत यांनी समर्थन केलं. ग्रामीण भागात वडिलांना बाप किंवा म्हातारा म्हणतात. तुझा बाप कुठाय? तुझा म्हातारा कुठे आहे? असं म्हटलं जातं. पण भाजपला काही काम नाही. खरगेंनी अनेक वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. भाजपला वाटत असेल की रस्त्यावर उतरल्याने सहानुभूती मिळेल, पण तसं काही होणार नाही. या सरकारचा बाप सुद्धा सत्तेतून जाईल. पंतप्रधानांचा बाप कोणी काढत नाही. मोदींना सवय आहे. माझी आई काढली, बाप काढला. मोदींना सवय आहे, लहान मुलांसारखं भोकाड पसरायची. ते लहान मुलांसारखे छाती बडवत असतात. कोणी कुणाचा बाप काढत नसतात. सरकारचा बाप जाईल असं म्हणत असतात. त्यामुळे कुणी कुणाचा बाप काढत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
