राखीव जागांवर निवडणूक लढवायचीय? तर, मग निवडणूक आयोगानं सांगितलेलं ‘हे’ काम लक्षात असूद्या

राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी प्रथमत: जात प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. त्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा.

राखीव जागांवर निवडणूक लढवायचीय? तर, मग निवडणूक आयोगानं सांगितलेलं 'हे' काम लक्षात असूद्या
UPS Madan


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांनी आतापासूनच वैयक्तिक स्तरावर पूर्तता करावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.

मदान यांनी सांगितले की, राज्यभरातील महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायती या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात मोठ्या प्रमाणावर निवडणुका होणार आहेत. संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी प्रथमत: जात प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. त्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा. त्यादृष्टीने आतापासूनच संबंधितांनी तयारी करणे आवश्यक आहे. जेणे करून नामनिर्देशनपत्र सादर करताना ऐनवेळी कोणाचीही धावपळ होणार नाही आणि एकही इच्छूक उमेदवार जातवैधता प्रमाणपत्राअभावी निवडणूक लढविण्यापासून वंचित राहणार नाही.

राज्यात पुढील वर्षी पंधरा महापालिकांच्या निवडणुका

राज्यात पुढच्या वर्षी मुंबईसह पंधरा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. महापालिका, नगरपंचायत, नगरपालिका यांच्यासाठी प्रभाग पद्धती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित झाली आहे. मुंबई, कल्याण डोंबिवली, नागपूर, नाशिक, वसई विरार, कोल्हापूर, औरंगाबाद,नवी मुंबई नाशिक, पुणे यासह इतर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत देखील संपणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगकडून करण्यात आलेल्या आवाहनानुसार निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या राजकीय नेत्यांनी जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.

कशी आहे नवीन प्रभाग रचना

ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठं राजकारण सुरु आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महापालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी अशी काही नेत्यांची भूमिका आहे. नगरपंचायतीत एक सदस्य प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग पद्धत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता मुंबई महापालिकेत 1 सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. तर इतर सर्व महापालिकेत 3 सदस्यीय प्रभार पद्धत असेल. त्याचबरोबर नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय, तर नगरपंचायतीला 1 सदस्यीय प्रभाग असणार आहे.

इतर बातम्या:

मुख्यमंत्र्यांचा अजित पवार, काँग्रेसला धक्का? प्रभाग रचनेवर कॅबिनेटमध्ये मतभेद? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

प्रभाग रचना करताना फडणवीसांचा दबाव होता का? एकनाथ शिंदे म्हणतात, कोर्टात कुणीही जाऊ शकतं!

Maharashtra state election commission appeal politician to done caste certificate validity for upcoming local body elections

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI