
अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि शिवसेना खासदार संजय राऊत या दोघांनी मिळून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेतली. या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी थेट मुंबई सोडायला तयार असल्याचं मोठं वक्तव्य केलं. यामागचं कारणसुद्धा त्यांनी सांगितलं आहे. मला लाज वाटते की माझी मुलं या शहरात वाढणार आहेत, असंही ते म्हणाले. वाढलेली लोकसंख्या, प्रदूषण यांमुळे मुंबईची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचं त्यांनी म्हटलंय. म्हणून कोणी दुसरा पर्याय दिला, तर लगेच मी मुंबई सोडून दुसरीकडे राहायला जाईन, असं त्यांनी सांगितलं.
“एक मुंबईकर म्हणून आज मी जेव्हा घरातून बाहेर पडतो, तेव्हा मला लाज वाटते की माझी मुलं या शहरात वाढणार आहेत. काही गोष्टी मी नियमित फॉलो करतो. आजचा एअर क्लालिटी इंडेक्स 183 आहे. मला कुणी पर्याय दिला की, कुठं तरी दुसरीकडं जा, तर मी लगेच जाईन. कारण आज मला बाहेर पडल्यावरही त्रास होतो. त्या मुंबईसाठी म्हणून काय करता येईल? एखाद्या फुग्यात त्याच्या क्षमतेपेक्षा पाचपट हवा भरली तर कसं होईल, तशी मुंबईची अवस्था आहे. आज मुंबईची लोकसंख्या 2 कोटी 31 लाख आहे. ही मुंबई डिकन्जेस्ट कधी होणार,” असा सवाल मांजरेकरांनी केला.
त्यावर उद्धव ठाकरे त्यांना पुढे म्हणाले, “मी तुम्हाला एक विचारतो, तुम्ही इतकी वर्षे मुंबईत राहता. माझा आणि राजचा जन्म मुंबईतला आहे. आज जे प्रदूषण दिसतंय. हवेचा किंवा प्रदूषणाचा जो काही निर्देशांक म्हणतो आपण, हा एवढा खराब कधी झाला होता का? हे विचारण्याचं कारण असं की, आता भाजपवाल्यांनी जी काही विकासाच्या प्रचाराची होर्डिंग्ज लावलीत, ही विकासाची गती नाही. यांची विनाशाची गती आहे. नियोजनशून्य विकास. हे तुमच्या त्रासाचं कारण आहे. तुम्ही जे म्हणताय ना, आओ जाओ घर तुम्हाला, इथूनच पहिली सुरुवात होते.”
“माझं तर म्हणणं आहे की, विकास नको आता. आता विकास करायचीही सोय मुंबईत राहिलेली नाही. मुंबई कार्बन डायॉक्साइडचं प्रमाण जगात सर्वाधिक आहे. आपण जो श्वास घेतो, त्यातून ऑक्सिजनपेक्षा जास्त कार्बन घेतो. मुंबईच्या बाबतीत माझं म्हणणं आहे की, जे लोंढे आले आहेत त्यांना राहू द्या, पण येणारे तरी थांबवायला पाहिजेत”, असं मत मांजरेकरांनी यावेळी मांडलं.