
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले. महायुतीचे सरकार मराठा आरक्षणाच्या मागणीविषयी सकारात्मक आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी काम करत असल्याचे ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे यांनी महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांवर स्तुतीसुमनं उधळली होती. त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजितदादांच्या वक्तव्याने महायुतीत मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढण्यावर गंभीर असल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी, ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. आझाद मैदानावर ते समर्थकांसाठी ठाण मांडून बसले आहेत.
आंदोलन शांततेत व्हावे
अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे हे वक्तव्य केले. राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात एक समिती गठीत करण्यात आली आहे. ते या मुद्दावर चर्चा करत आहेत. प्रत्येकाला विरोध प्रदर्शन करण्याचा, आंदोलनाचा अधिकार आहे. पण हे आंदोलन शांततेत व्हायला हवे. महायुतीचे सरकार आंदोलकांच्या मागणीवर समाधान शोधण्याचा, तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा विश्वास आहे की यावर तोडगा जरुर निघेल.
कोर्टाने दिली आंदोलनाची परवानगी-अजित पवार
मनोज जरांगे यांना एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी कोर्टाने दिल्याचे दादांनी स्पष्ट केले. जर न्यायालय काही निर्देश देत असेल तर आपल्या सर्वांना त्या आदेशाचे पालन करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मनोज जरांगे यांना एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. पण ते बेमुदत उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये या मुद्यावरून तणाव दिसून येतो.
प्रत्येक समुदायाला मिळावा न्याय-अजित पवार
आरक्षणाच्या मुद्यावर अजितदादांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही या मुद्दावर सकारात्मक आहोत. यावर कोणता ना कोणता मार्ग नक्कीच निघेल. आमचं सरकार यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करत आहोत. सरकार आरक्षणावर समाधानासाठी मेहनत घेत असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देत असल्याच्या लक्ष्मण हाकेंच्या आरोपवर त्यांनी उत्तर दिले. प्रत्येक समुदायाला न्याय मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.